ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केसुर्ली येथील मुरुम वाहतुकीमुळे रस्ता खराब

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

     केसुर्ली गावाजवळील महसूल विभागाच्या जागेवर सुरू असलेल्या मुरुम उत्खननामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केसुर्ली गावाच्या बाजूला असलेल्या महसूल विभागाच्या जागेवर मुरुम उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणाहून केसुर्ली, हनुमान नगर, जामा मस्जिद मार्गे दररोज मोठ्या प्रमाणावर हायवा वाहनांद्वारे मुरुमाची वाहतूक होत असून, सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नसून नगर परिषद क्षेत्रातील रस्ता आहे.

या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, नागरिकांचा संताप नगर परिषद प्रशासनावर व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी तात्काळ हस्तक्षेप करून मौजा केसुर्ली गाव येथील गौण खणीज (मुरुम) उत्खननासाठी दिलेली परवानगी रद्द करावी अथवा सदर वाहतूक शहरातील मुख्य रस्त्याऐवजी दुसऱ्या पर्यायी पांदन रस्त्याने वळवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी निवेदन देताना भद्रावती नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, राजु सारंधर, शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक पप्पु सारवण, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश जीवतोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये