चांदा ब्लास्ट
हीच का आमची लोकशाही?
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय देईल, त्यांच्या रोजच्या संघर्षांना आवाज देईल, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, पूरस्थिती, नद्यांच्या धरणातील गाळ, जंगल क्षेत्रातील अतिक्रमण, आरोग्य आणि शिक्षण या ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने संपूर्ण अधिवेशनात अशा चर्चा नाममात्र ठरल्या. आमदारांचा टॉवेल-बनियानमधील राडा, मंत्रीमहोदयांनी आईच्या नावावर चालविलेले बार, नोटांनी भरलेली बॅग समोर ठेवून बनियान लुंगीवर बसत सिगारेटचे झुरके ओढतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ, विधान भवन परिसरातील हाणामाऱ्या आणि सभागृहात बसून ऑनलाईन जंगली रमी खेळतानाचा कृषिमंत्र्यांनाचा व्हायरल झालेला व्हिडिओ… आणि लातूरमध्ये या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या छावा संघटनेच्या अध्यक्षांना झालेली मारहाण, हे पाहून महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला ‘हेच का आमचे प्रतिनिधी? हीच का आमची लोकशाही?’ असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.
आ. संजय गायकवाड यांचा टॉवेल-बनियानमधील ‘आदरम्य’ प्रवेश आणि त्यानंतर कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण; हे केवळ व्यक्तिकेंद्रित न राहता आमदारपदाच्या प्रतिष्ठेवरचं कलंकित सावट आहे. लोकशाहीत विधिमंडळ हे मंदिर असतं. त्या मंदिरात असं वर्तन हे केवळ अपमानकारक नाही, तर लोकांच्या निवडीचा अपमान आहे. त्याहून अधिक लज्जास्पद बाब म्हणजे सत्ताधाऱ्यांनी या प्रकाराकडे वळूनही न पाहणं… हे सुद्धा तितकेच गंभीर आहे.
दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सुरू असलेला बार आणि त्यामध्ये सुरू असलेले अनैतिक, अश्लील प्रकार… हे शासनाच्या ‘सुशासनाच्या’ गप्पांवर मोठ्ठं प्रश्नचिन्ह लावणारे आहे. या प्रकरणावरून विधानसभेत आवाज उठवणाऱ्या विरोधकांवर, विशेषतः अनिल परब यांच्यावर आरोपांचे बाण सोडले गेले, पण मूळ मुद्द्यावर गंभीर चर्चा करण्याची इच्छाशक्ती कुठेच दिसली नाही.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका नवीन नाही, पण त्याची पातळी आज इतकी खालावली आहे की सभागृहाच्या भिंती देखील लाजून खाली वाकतील, असे चित्र आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांची आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता केलेली टीका, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधानभवन परिसरात दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारामारी, हे चित्र लोकशाहीचं नसून गुन्हेगारी मानसिकतेचं आहे.
मंत्री संजय सिरसाट यांच्यावर तर अनेक स्तरांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या मुलाच्या नावाने हॉटेल लिलावात झालेले गैरप्रकार असो वा त्यांच्या स्वतःच्या बेडरूममधील नोटांनी भरलेली बॅग, झुरक्यांचे व्हिडिओ, आणि लुंगी-बनियानमधून झालेलं संभाषण; हे केवळ हास्याचं कारण नाही, तर धक्कादायक गंभीर स्थितीचं निदर्शक आहे. लोकांचा पैसा, लोकांचा विश्वास, आणि लोकांनी दिलेली सत्ता ही जर इतक्या हलगर्जीपणाने वापरण्यात आली, तर ती लोकशाहीची चेष्टा ठरते, हे वेगळं सांगायला नको.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला असो, की कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे ऑनलाईन जंगली रमी खेळतानाचे व्हिडिओ, हे कायदेमंत्र्यांच्या भूमिकेच्या विरोधातले साक्षात्कार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे वाढत असताना कृषिमंत्री ऑनलाईन जुगारात गुंतलेले असतील, तर शासनाची प्राथमिकता काय असेल, हे स्पष्ट होते.
लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिका-यांनी पत्ते फेकून माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळाबाबत जाब विचारला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना मारहाण केली. हा प्रकार म्हणजे सत्तेचा माज आहे.
त्याहून भयावह बाब म्हणजे ‘हनी ट्रॅप’ प्रकरण. याचा वापर करून एकमेकांना ब्लॅकमेल करणे, राजकीय षड्यंत्र रचणे, बदनामीचे हत्यार बनवणे, हे सर्वप्रकार महाराष्ट्राच्या परंपरेला तडा देणारे आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील आरोप हे वैयक्तिक नसून राजकीय घातपाताचे लक्षण आहेत. या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, शासनात संयम, शुचिता, आणि जबाबदारी या गोष्टी फक्त भाषणापुरत्याच उरल्या आहेत.
मा. मुख्यमंत्री महोदय, आज महाराष्ट्राची प्रतिमा देशभरात बिघडत चालली आहे. आम्ही अभिमानाने सांगायचो की ही ज्ञान, शौर्य आणि समाजसुधारणेची भूमी आहे. पण आज महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन हे सर्कशीत रूपांतरित झालं आहे. आणि सारे लोकप्रतिनिधी त्या सर्कशीचे विदूषक झाले आहेत. प्रश्न असा आहे की, ही सर्कस किती काळ चालणार? जर आपले लोकप्रतिनिधी आपल्या पदाला जागले नाहीत, तर जनता योग्य वेळी त्यांना आपली जागा दाखवेल.
रितेश उर्फ रामू तिवारी
जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटी