पंढरपूरहून परतल्यानंतर गावात स्वच्छतेचा जागर
बिबी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आषाढी एकादशी व पौर्णिमेनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले बिबी येथील २६ भाविक परतल्यानंतर एक वेगळा संदेश घेऊन आले. फक्त दर्शनावर समाधान न मानता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावात स्वच्छता दिंडी काढत गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
भाविकांनी पंढरपूर येथे देखील दर्शनाबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान केले होते. अंगात भक्तिभाव, हातात खराटा आणि मुखात भारुडाच्या ओव्या अशा भक्ती आणि स्वच्छतेच्या संगमातून ही अनोखी दिंडी साकारली गेली.
दिंडीमध्ये लहान बालगोपालांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता, वृक्षारोपण आणि समाजजागृती यांचा त्रिवेणी संगम असलेला हा उपक्रम गावात चांगलाच गाजला. विशेष म्हणजे या भाविकांनी सायंकाळी हनुमान मंदिर परिसरात हजारो गावकऱ्यांना भोजनदानही केले.
बिबी गावातील या भक्तांनी सामाजिक जबाबदारीची भावना जोपासत जे उदाहरण उभं केलं, ते खरोखरच अनुकरणीय आहे. ग्रामविकास आणि सामाजिक प्रबोधनाचा मार्ग स्वच्छतेतूनच जातो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
एक पेड माँ के नाम
परतल्यानंतर गावात त्यांनी एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत झाडे लावून माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी केली. पर्यावरणाची जनजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.