रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर द्वारे आयोजित रानभाजी महोत्सवाला चंद्रपूरकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून दररोज सरासरी एक लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या महोत्सवादरम्यान अनुभवास मिळाली.
शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे 18 जुलै रोजी रानभाजी महोत्साचे उद्घाटन झाल्यनंतर सलग पाचही दिवस शहरातील नागरीक, नामवंत व्यक्ती, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, पर्यावरणप्रेमी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचा-यांनी या महोत्सवाला भेट दिली. तसेच येथील स्टॉलवरील उत्पादने आणि माळरानातील भाज्यांची खरेदी केली.
जिल्ह्यातील रानभाज्या संकलन करणारे आदिवासी बांधव, बचत गट, माविम, आत्मा, उमेद, वनधन विकास केंद्र, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी इत्यादी संस्थांकडे नोंदणीकृत असलेले महिला व पुरूष बचतगट यांनी रानभाजी महोत्सवामध्ये भाग घेऊन आपल्या उत्पादनांची विक्री केली. या महोत्सवामध्ये दररोज सरासरी एक लाखापेक्षा अधिक रूपयांची आर्थिक उलाढाल होऊन आदिवासी बांधवांना त्याचा प्रत्यक्ष फायदा पोहोचला आहे.
या रानभाजी महोत्सवामध्ये रानभाजी, रानफळे, रानमेवा, वनौषधी, अन्नधान्य इत्यादी क्षेत्रात उत्पादन, संकलन, विपणन करणारे नोंदणीकृत आदिवासी बचतगट, व्यक्ती, संस्था यांनी प्रकर्षाने सहभाग नोंदविला. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या व विशेषकरून चंद्रपूर जिल्ह्यामधील रानावनातून, बांधावरून गोळा केलेल्या शेरडीरे, मशरूम, टेकोडे, काटवल, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोंबडा, तरोटा, धानभाजी, पातूर, गोपण, टट्टूची फुले, केना, चुचूर, इकदोडे, पानवेल, मसाला पान, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआले, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, रानकोचई इत्यादी रानभाज्या व रानफळे तर पानफुटी, कांडवेल, गुळवेल, अमरवेल, अश्वगंधा, पळस, अर्जून अश्या औषधी वनस्पती प्रदर्शनास व विक्रीस उपलब्ध होत्या. विविध पारंपारीक आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील या महोत्सवादरम्यान लावण्यात आले होते. वनधन केंद्रांनी मोहफुलांपासून बनविलेले विविध पदार्थ, बांबुपासून बनविलेली उत्पादने देखील ठेवण्यात आली होती. तद्वतच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांचेकडील शबरी नॅचरल ब्रँडची विविध उत्पादने प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आली होती.
प्रकल्प अधिका-यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार :
आझाद गार्डन येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवास चंद्रपूर येथील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आदिवासी बांधवांना रोजगार मिळविण्यास मदत केली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले, त्याबद्दल आदिवासी विकास विभागातर्फे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.