युवकांनो! रोजगार प्राप्त करून देशाच्या प्रगतीत हातभार लावा – प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे
सरदार पटेल महाविद्यालयात पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ; 637 उमेदवारांची प्राथमिक निवड

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. औष्णिक विद्युत केंद्र, पेपर मील, कोळसा खाणी, सिमेंट, बांबु व इतर उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील युवा वर्गाला रोजगार देण्याचा संकल्प उद्योगांनी केला आहे. त्यामुळे युवक – युवतींनीसुध्दा आपल्या गुणवत्तेच्या आधारावर रोजगार मिळवून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सरदार पटेल महाविद्यालय आणि मॉडेल करीअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरदार पटेल महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करतांना डॉ. व्यवहारे बोलत होते. मंचावर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, डॉ. जयेश चक्रवर्ती, उपप्राचार्य स्वप्नील माधवशेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले उपस्थित होते.
आजच्या युवा वर्गाला रोजगार देणे, हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा व इतर सोयीसुविधा प्राप्त करायच्या असेल आणि चांगले जीवन जगायचे असेल तर रोजगाराची आवश्यकता आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. येथील कंपन्यानी युवकांना रोजगार देण्याचा केलेला संकल्प हा अभिनंदनीय आहे. उद्योगांनी आपली निवड केली पाहिजे, ही जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण करा, जेणेकरून कंपन्यांना वाटले पाहिजे की, या तरुण-तरुणीची आपल्या कंपनीला गरज आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली प्रगती झाली तर, आपले कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान राहील, असेही डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. मोबाईलचा उपयोग केवळ वेळ वाया घालविण्यासाठी करू नये तर करीअर घडविण्यासाठी करा. प्रत्येकच आई-वडीलांना मुलांकडून चांगल्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तर प्राचार्य डॉ. काटकर म्हणाले, महाविद्यालयात अनेक उपक्रम सुरू असतात. मात्र पदवी मिळाल्यानंतर रोजगाराचा प्रश्न आजच्या पिढीसमोर उभा आहे. त्यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व तरुण – तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाळे यांनी केले. संचालन डॉ. अनिता मत्ते यांनी तर आभार डॉ. स्वप्नील माधवशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, रोजगार इच्छुक तरुण – तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
637 उमेदवारांची प्राथमिक निवड : पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण 1107 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. तसेच सहभागी कंपन्यांनी 1030 रिक्त पदे कळविली होती. यापैकी 637 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.