ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वॉर्डमधील अवैध बांधकामांवर राहणार मनपाच्या टीमची नजर

प्रत्येक झोनमध्ये एक टीम कार्यरत ; सातत्याने होणार कारवाई

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी झोन निहाय टीम नियुक्त करण्यात आली असुन प्रत्येक वॉर्डमध्ये सुरु असलेल्या अथवा सुरु होणाऱ्या सर्व अवैध बांधकाम तपासणी सदर टीमद्वारे केली जाणार आहे.

  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात परवानगीविना वाढणाऱ्या अवैध बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने झोन निहाय स्वतंत्र तपासणी पथकांची स्थापना केली आहे. ही पथके त्यांच्या झोनमधील प्रत्येक वॉर्डामध्ये नियमितपणे दौरे करत असून सुरु असलेल्या किंवा नव्याने सुरु होणाऱ्या बांधकामांची तपासणी करीत आहेत.

   अवैध बांधकाम हटविण्यासाठी कारवाई दरम्यान अवैध बांधकाम करणाऱ्यांना प्रथम नोटीस बजावण्यात येऊन अतिक्रमण काढण्यास ठराविक कालावधी दिला जातो. यानंतरही अतिक्रमण वा अवैध बांधकाम स्वतः हुन न हटविल्यास मनपातर्फे कारवाई केली जाते.कारवाई दरम्यान दबाव आणण्याचा प्रकार अतिक्रमण धारकांकडुन झाल्यास शासकीय सेवकाला कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच कारवाईचा प्रत्यक्ष खर्च, दंड व प्रशासकीय शुल्क संबंधितांकडून वसूल करण्यात येईल

   पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा.हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पूररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश मा.न्यायालयाने दिलेले आहेत.

   शहरातील एखादे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित अधिकारी सरसावले की, विविध मार्गातुन त्याला विरोध केला जातो यामुळे शहरातील अवैध बांधकाम व अतिक्रमणात मोठय़ा प्रमाणात वाढ होते. अतिक्रमण तसेच अवैध बांधकामाविरुद्ध आलेल्या तक्रारी मग त्या ऑनलाईन आलेल्या व प्रत्यक्ष कार्यालयात प्राप्त झालेल्या असो त्याच शहनिशा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे तसेच कुठल्याही स्वरूपाच्या दबावाला झुगारून कार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

     कुठलेही बांधकाम हे परवानगी घेऊनच करावे,बांधकाम परवानगी घेतली नसल्यास त्वरीत ऑनलाईन “mahavastu.maharashtra.gov.in” या संकेत स्थळावर सादर करावी. तसेच किल्यालगत 100 मीटर परिसरात, नझूल परिसर,ब्लू लाईन परिसरात कुठलेही बांधकाम न करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये