तीन आमदारांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

चांदा ब्लास्ट
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तिकुमार भांगडिया आणि आमदार करण देवतळे यांच्या सोबत उमरेड येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरली. यावेळी बँकेचे संचालक मंडळही उपस्थित होते. ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून जिल्ह्यातील आर्थिक विकास, सहकारी संस्थांचे मजबुतीकरण व शेतकऱ्यांपर्यंत कर्जपुरवठा सुलभ करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघात सुरू केलेल्या “देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह” उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली आणि या सामाजिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या