मी कथक नृत्याच्या क्षेत्रात जे मिळवलं ते केवळ गुरूंच्या संस्कारांमुळेच : डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर
संस्कार भारती चंद्रपूरचा गुरुसन्मान सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
मी कथक नृत्याच्या क्षेत्रात जे मिळवलं ते केवळ माझ्या गुरूंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. चंद्रपूर ही माझी कर्मभूमी आहे. या शहराने मला भरभरून प्रेम दिलं. अनेक विद्यार्थीनी नृत्य पारंगत झाल्याचं समाधान गाठीशी आहे. कोरोना काळात आम्ही नागपूरला स्थलांतरीत झालो त्यामुळे अनेक योजना मनातच राहिल्या. संस्कार भारती परिवाराशी माझे विशेष स्नेहबंध आहेत. त्यांनी गुरु म्हणून केलेला सन्मान माझ्यासाठी माझ्या माणसांनी केलेला लाखमोलाचा सन्मान आहे, हा सन्मान या क्षेत्रात काम करताना मला नवी ऊर्जा देणारा असल्याची भावना ज्येष्ठ कथक नृत्यांगना डॉ भाग्यलक्ष्मी देशकर यांनी व्यक्त केली.
दि. 20 जुलै रोजी संस्कार भारती चंद्रपूरच्या वतीने नटराज पूजन आणि गुरुसन्मान सोहळा स्थानिक न्यू इंडिया कॉन्व्हेंट मध्ये संपन्न झाला. यावेळी सन्मानाला उत्तर देताना डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर बोलत होत्या. यावेळी मंचावर संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य वक्ते डॉ ताराचंद कंठाळे, प्रांत कार्यकारिणी सदस्य मंगेश देऊरकर, चंद्रपूर शाखेच्या अध्यक्षा सौ संध्या विरमलवार, उपाध्यक्ष डॉ राम भारत यांची उपस्थिती होती. गुरु हा विचारांनी विकारांवर विजय मिळवायला शिकविणारा मार्गदर्शक असल्याचे सांगत गुरु शिष्य परंपरेचे श्रेष्ठत्व विशद करणारी अनेक उदाहरणं देत वक्ते डॉ. ताराचंद कंठाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गुरुसन्मान सोहळ्यासंदर्भातील भूमिका सौ संध्या विरमलवार यांनी विशद केली तर प्रास्ताविक डॉ राम भारत यांनी केले. नृत्यगुरु डॉ भाग्यलक्ष्मी देशकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ देशकर यांची शिष्या प्राजक्ता उपरकर हिने औक्षण करुन आपल्या गुरूचे पूजन केले. मानपत्राचे लेखन व वाचन अजय धवने यांनी केले.
संस्कार भारतीच्या रेषारंग चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रणाली पांडे यांनी केले. यावेळी प्रांत कार्यकारिणी सदस्य मंगेश देऊरकर यांनी संस्कार भारती चंद्रपूरची 2025- 26 ची कार्यकारिणी जाहीर केली.
यावेळी मंचीय कला विधा संयोजक प्राजक्ता उपरकर हिने गणेश वदंना, गुरुवंदना, वारी नृत्य आदी वैविध्यपूर्ण नृत्याच्या माध्यमातून नृत्यगुरु भाग्यलक्ष्मी देशकर यांना मानवदंना दिली. अन्वया बोरीवार, प्रचिती कत्तूरवार, अंजली आक्केवार, सौम्या शिवणकर, श्रुती पेंचलवार यांनी व चमुने नृत्ये सादर केली. आभार प्रदर्शन सचिव लिलेश बरदाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजित आकोटकर, किरण पराते, सुहास दूधलकर, आशिष बाला, भावना हस्तक, अपर्णा घरोटे, क्षमा धर्मपुरीवार,राज ताटपल्लीवार, मुक्ता बोझावार, जागृती फाटक, सूरज उमाटे, प्रणिता सुर्वे आदींनी परिश्रम घेतले.