विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक हे केंद्रबिंदू : आ. जोरगेवार
छोटुभाई पटेल हायस्कुलमधील आमदार विकास निधी मधून शाळेतील ६ डिजिटल वर्ग खोलीचे उदघाटन

चांदा ब्लास्ट
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘शाळा’ हेच प्रभावी माध्यम असून, शिक्षक हे केंद्रबिंदू आहेत. तसेच, शाळा व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात’’, असे चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
ते छोटुभाई पटेल हायस्कुलमधील आमदार विकास निधी मधून शाळेतील ६ डिजिटल वर्ग खोलीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी आदर्श शिक्षण मंडळचे अध्यक्ष सुनिल पटेल, कार्याध्यक्ष जिनेश पटेल, सचिव जितेंद्र पटेल, कोषाध्यक्ष अतुल पटेल यांचेसह छोटुभाई पटेल हायस्कुलच्या मुख्याध्यपिका सौ कांत (वैद्य )मॅडम यांची उपस्थिती होती.
आमदार विकास निधी मधून शाळेतील ६ डिजिटल वर्ग खोलीच्या उदघाटनाच्या सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते स्व. छोटुभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेतील ६ डिजिटल वर्ग खोलीचे आमदार किशोर जोरगेवार याचे हस्ते विधीवत उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विषयावर प्रकाश टाकला. शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करू. त्याच्या प्रगतीसाठी काही कमी पडू देणार नाही. परत येत्या काही काळात अजून निधी उपलब्ध करून उर्वरित वर्ग खोल्या डिजिटल करून देऊ असेल आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेचे शिक्षक बम सर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.