आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला गरजू विद्यार्थिनींना तात्काळ मदतीचा हात
आ. मुनगंटीवार यांच्या एका फोनवर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
गरजू मुलींना शिक्षण साहित्याचा त्वरित पुरवठा
चंद्रपूर : मुल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील महारोगी सेवा समिती वरोरा तर्फे विना अनुदानित वसतिगृह चालवले जाते, जिथे अत्यंत गरीब आणि दुर्गम भागातील मुली शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. या मुलींना वह्या, पुस्तके, छत्री आणि टिफीन बॉक्स यांसारख्या अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचा तुटवडा जाणवत होता. या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर समितीचे स्वयंसेवक श्री. अरुण कदम यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना केवळ एक फोन केला. या एका फोनवर क्षणाचाही विलंब न करता आ. मुनगंटीवार यांनी विद्यार्थिनींना लागणारे साहित्य तातडीने पुरवण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.
विद्यार्थी शैक्षणिक साहित्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या संवेदनशीलतेतून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा पुढाकार आश्वासक ठरला आहे. त्यांच्या या तत्परतेनंतर अवघ्या काही तासांत शैक्षणिक साहित्य वसतिगृहात पोहोचले. महारोगी सेवा समितीचे स्वयंसेवक आणि विद्यार्थिनींनी या मदतीबद्दल आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
विद्यार्थिनींच्या गरजांप्रती आपुलकी दाखवत आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांचा मदतीचा हात प्रेरणादायी ठरला आहे.