चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित
गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्रासाठी ४१४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी ; मुल शहराला मिळणार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

चांदा ब्लास्ट
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी महत्त्वाच्या बैठकीत दिले निर्देश
मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीचा ध्यास घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासालाही त्यांच्या प्रयत्नांमुळेच गती मिळणार आहे. यासंदर्भातील एक मोठा निर्णय अलीकडेच झाला. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्र चंद्रपूर शहरात सुरू करण्यासह मुल शहरात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे.
विदर्भातील युवकांचे भविष्य उज्वल करण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात भरीव प्रगती साधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक पाऊल पडले आहे. या संदर्भातील बैठक अलीकडेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत मुंबईतील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीस आ.सुधीर मुनगंटीवार यांची प्रमूख उपस्थिती होती. यासोबत उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गोंडवाना विद्यापीठाचे पदाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत दोन्ही विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही प्रस्तावांना त्वरित कार्यवाहीसाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी तब्बल ४१४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच जिल्ह्यातील युवकांना आता शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे रोजगारक्षम शिक्षणाचे दालन खुले होईल आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्तर भक्कमपणे उंचावणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरच्या शिक्षण विकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल युवकांच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहणारे ठरणार आहे, असा विश्वास नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.