रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरतीने देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाला उत्साहात सुरुवात
पुढील नऊ दिवस चालणार विविध सामाजिक, आरोग्यवर्धक कार्यक्रम - आ. जोरगेवार

चांदा ब्लास्ट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाला ९ रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरती आणि वृक्षारोपण कार्यक्रमाने उत्साहात सुरुवात झाली आहे. पुढील नऊ दिवस हा सेवा सप्ताह चालणार असून, यामध्ये विविध धार्मिक, आरोग्यवर्धक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै ते २९ जुलै पर्यंत सदर सेवा सप्ताह चालणार आहे. दरम्यान, आज पंजाबी सेवा समिती, कृष्ण नगर समाज मंदिर, बंगाली कॅम्प, पंचशील चौक, घुग्घूस येथील माता मंदिर, श्यामनगर, नूतन व्यायामशाळा, महिला पतंजली योग समिती, भवानजीबाई हायस्कूल येथे रक्तदान शिबिरे पार पडली. यामध्ये जवळपास ३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तर तुकूम येथील लॉ कॉलेज येथे योग-नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोरवा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर बायपास मार्गावरील अष्टभुजा मंदिर आणि महाकाली वॉर्डातील सुपर मार्केट येथील दुर्गा मंदिर येथे महाआरती करण्यात आली.
यातील अनेक कार्यक्रमांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज या पवित्र कार्याची, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाची सुरुवात करताना आनंद होत आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजासाठी समर्पित भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी फक्त योजना पुरेशा नसतात, तर त्या योजनांना समर्पित मन, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव लागतो. आपल्या चंद्रपूर मतदारसंघात हा सेवा सप्ताह सुरू करत आहोत, जिथे रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरती, वृक्षारोपण आणि शैक्षणिक-सामाजिक उपक्रम अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा सुरू झाला आहे.
रक्ताच्या एका थेंबातून कोणाचे तरी जीवन वाचवण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. तसेच, आजच्या योग शिबिरातून आपण आरोग्यविषयी सजगता वाढवत आहोत. वृक्षारोपणाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहोत आणि महाआरतीद्वारे आपल्या परंपरांचा गौरव करत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
या सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.