प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात रंगला स्त्री-शक्तीचा जागर
खा. धानोरकर यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे चंद्रपूरचे नाव देशात गाजतेय

चांदा ब्लास्ट
‘न्यू होम मिनिस्टर’ सोहळ्याला महिलांचा उदंड प्रतिसाद
चंद्रपूर :_ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष संकल्पनेतून चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात आलेला महिलांचा भव्य सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शनिवारी गांधी चौक येथील महानगरपालिका पटांगणात पार पडला. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुप्त गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, “खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या धडाडीच्या आणि प्रभावी नेतृत्वामुळे आज चंद्रपूरचे नाव संपूर्ण देशात गौरवाने गाजवले आहे. दिल्लीच्या संसदेत जिल्ह्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्यासोबतच, स्थानिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे आज चंद्रपूरची ओळख एक प्रगतशील जिल्हा म्हणून देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटली असून, हा ‘स्त्री-शक्ती जागर’ सोहळा ऐतिहासिक ठरला आहे.”
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “महिलांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागतो, मात्र त्यांनी संकटांनी खचून न जाता त्या आव्हानांना पेलण्याची ताकद ठेवली पाहिजे. महिला आपल्या प्रभावी नेतृत्वाने कोणत्याही पदाला योग्य न्याय देऊ शकतात, त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने राजकारणात आले पाहिजे. विशेष म्हणजे, स्त्रियांनीच स्त्रियांची पाठराखण केली, तर कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही. स्वतःची क्षमता ओळखून महिलांनी संघटित व्हावे आणि जिल्ह्याच्या प्रगतीत योगदान द्यावे.”
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘न्यू होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक खेळ ठरला, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात वरोरा नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे, कवयत्री सुनीता धोटे, डॉ. मृणाली निंबाळकर, नुपूर तापाले आणि वाडके यांचा समावेश होता.
या सोहळ्याला प्रदेश महिला महासचिव तथा नगरसेविका सुनंदाताई धोबे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामंगे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, प्रवीण काकडे, जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुंदाताई जेनेकर, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेविका सईदा शेख, नगरसेविका मनीषा बोबडे, नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे, नगरसेवक सुरेंद्र अडबाले, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक रामनरेश यादव, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, राहुल तायडे, शहजाद शेख, पायल दुर्गे, राजूरा महिला तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, राजुरा महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, भद्रावती महिला तालुकाध्यक्षा संध्या पोढे, भद्रावती महिला शहराध्यक्षा सरिता सूर, कोरपणा महिला तालुकाध्यक्ष आशा खासरे, गोंडपिपरी महिला तालुका अध्यक्ष सोनू दिवसे, अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, सुवर्णा लोखंडे, प्रतिभा पेंदाम, हर्षा चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंदाताई जेनेकर यांनी केले तर आभार अश्विनी खोब्रागडे यांनी मानले.



