बांबू सखींच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मिळणार हक्काचा रोजगार
चिचपल्ली येथे ७ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीच्या वतीने ‘कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागीर समुदायाचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘बांबू सखी’ तयार करण्यासाठी सात दिवसीय ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ नुकतेच यशस्वीरित्या पार पडले.
विशेष प्रशिक्षण सत्रामध्ये मोहरली, चोरगाव, निंबाळा, बल्लारशा, वरवट आणि घुग्गुस या गावातील प्रशिक्षित बांबू सखी आता गावागावात जाऊन इतर महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देतील. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर न पडता, घरबसल्या सन्मानाने काम करण्याची आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. वन परिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे सत्र पार पडले. प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन आणि सत्र संचालक म्हणून बी.आर.टी.सी.च्या पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी जबाबदारी पार पाडली. या सात दिवसांच्या कालावधीत संतोष बजाईत आणि गोविंदा आत्राम यांनी प्रशिक्षक म्हणून महिलांना बांबूकामातील विविध तांत्रिक कौशल्ये आणि आधुनिक डिझाइन्सचे प्रशिक्षण देऊन कुशल केले.
प्रशिक्षणाचे उद्दिष्ट : पारंपारिक बांबू कलेला आधुनिकतेची जोड देणे, ग्रामीण महिलांना ‘बांबू सखी’ म्हणून विकसित करून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे, स्थानिक स्तरावर बांबू उद्योगाला चालना देऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हा आहे. या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांबू हस्तकलेचे नवे जाळे निर्माण होणार असून महिलांच्या आर्थिक स्तरात मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.



