कमर्शिअल सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी
भद्रावती कॅटरिंग असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कॅटरिंग व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर भद्रावती येथील कॅटरिंग, डेकोरेशन, बिछायत व डी.जे. असोसिएशनने तहसीलदारांकडे कमर्शिअल गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
असोसिएशनतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक कॅटरिंग व्यावसायिकांनी एक ते दोन महिन्यांपूर्वीच लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांचे बुकिंग स्वीकारले आहे. मात्र सध्या गॅस सिलेंडरची कमतरता भासत असल्याने हे कार्यक्रम कसे पार पाडावेत, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर अत्यावश्यक असून त्याशिवाय मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या परिस्थितीमुळे नव्याने स्वयंपाकाच्या ऑर्डर घेणे थांबविण्यात आले आहे. मात्र आधीच स्वीकारलेल्या कार्यक्रमांचे काय करावे, हा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. कार्यक्रम रद्द करणेही शक्य नसल्याने लग्नसमारंभात गोंधळ निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने कॅटरिंग व संबंधित व्यवसायिकांना कमर्शिअल गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कटलावार,उपाध्यक्ष किशोर खंडाळकर, सचिव भुपेश कायरकर तसेच असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



