चंद्रपूरात मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पासून “देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह”
आमदार जोरगेवार यांचा पुढाकार, सायकल वाटप, महारुद्राभिषेक यासह १० दिवस चालणार ३३४ विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या २० जुलैपासून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. उद्या १० रक्तदान शिबिरे, ३ ठिकाणी धार्मिक स्थळी महाआरती, ७ ठिकाणी योग शिबिरे आणि ७ ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजनातून या सेवा सप्ताहाला सुरवात होणार आहे. पुढील १० दिवसात चंद्रपूर मतदारसंघात तब्बल ३३४ वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून या सेवासप्ताहाला एक व्यापक आणि लोकाभिमुख स्वरूप देण्यात आले आहे.
या सप्ताहादरम्यान आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक समरसता, अध्यात्म व संस्कृती अशा विविध क्षेत्रातील उपक्रम राबवले जात असून, शहर आणि ग्रामीण परिसरातील जनसामान्यांपर्यंत थेट पोहोचणारे उपक्रम या निमित्ताने पार पडत आहेत.
सप्ताहात शहरातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोहीम, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अल्पसंख्याक समाजासाठी उपक्रम, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रप्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमधून सामाजिक भान निर्माण करण्याबरोबरच नागरिकांना थेट लाभ मिळावा, हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
सदर सेवासप्ताहात २८ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिवापूर वार्डातील प्राचीन शिवलिंगाजवळ महारुद्राभिषेक आणि जलाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात राज्यभरातील ५५ पवित्र नद्यांचे जल अर्पण करून धार्मिकतेसोबत पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.
२७ जुलै रोजी शकुंतला लॉन येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध तपासण्या, रक्त व नेत्र तपासणी तसेच मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे. तर २९ जुलै रोजी त्याच लॉनमध्ये २,०५५ शाळकरी विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात येणार असून, शिक्षणात सातत्य राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सेवासप्ताहात विविध संस्था, स्वयंसेवी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून येत असून, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात या उपक्रमांमुळे एक सकारात्मक सामाजिक चळवळ निर्माण होत आहे. लोककल्याणाच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या सप्ताहामुळे आरोग्यविषयक जागरूकता, शैक्षणिक प्रोत्साहन आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.