अतिसारावर नियंत्रणासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ओआरएसचे वाटप
0 ते 5 वर्षे वयोगटातील 19053 बालके

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत दिनांक 2 जुन ते 31 जुलै 2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असुन या कालावधीत 0 ते 5 वर्षाच्या बालकांना ओ.आर.एस.(ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) व झिंक (Zinc) गोळ्यांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी दिली.
चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात 5 वर्षाखालील बालकांची एकुण संख्या (मुले – मुली) 19053 आहे. या सर्व बालकांना ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) ची गोळी देऊन अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शुन्य करणे, हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.अतिसारामुळे मुलांमध्ये निर्जलीकरण (dehydration) होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या मोहिमेद्वारे योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी गृहभेटीदरम्यान प्रत्येक बालकासाठी 1 ओ.आर.एस. (ORS) पाकीट हे बाळाला भविष्यात जुलाब, शौच झाल्यास वापरण्याकरीता पालकांना वापरण्याच्या माहितीसह देण्यात येत आहे.
या मोहिमेत मनपाच्या 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात 170 आशा स्वयंसेविकांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येत असुन 0 ते 5 वर्षाखालील बालकांच्या मातांना अतिसाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयीची माहिती गृहभेटीदरम्यान देण्यात येत आहे.
प्रत्येक आरोग्य केंद्रात ओ.आर.एसचे महत्व सांगणारे ओआरटी कॉर्नर स्थापित करण्यात आलेले आहे तसेच आरोग्य सेविका मार्फत आरोग्य पोषण सत्रात व शाळेत हात धुण्याच्या योग्य पद्धतीची प्रात्यक्षिके दाखवुन महत्व समजाऊन सांगण्यात येत आहे.
या अनुषंगाने बालकांचा आजार कमी न झाल्यास अथवा अतिसाराचे प्रमाण आढळल्यास पालकांनी त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र / दवाखाना / रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले आहे.
अतिसाराची लक्षणे :
बालक अधिक आजारी होत असेल.
अस्वस्थपणा, चिडचिडेपण
डोळे खोल जाणे
घटाघट पाणी पिणे,सतत तहानलेले असणे
शौचद्वारे रक्त येत असल्यास
ताप येत असल्यास.
अतिसाराची कारणे :
रासायनिक आणि उघडे पदार्थ
शिळे अन्न सेवन
दूषित पाणी पिणे
अन्नाचे अपचन
आपण काय करू शकता:
आपल्या मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
ORS आणि झिंकचा वापर करा.
आपल्या मुलाला पुरेसे द्रव द्या.
आपल्या परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा
आणि त्यांना सहकार्य करा