चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांचा एल्गार!
तात्काळ दुरुस्ती करा नाहीतर टोलवसुली थांबवा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात आणि सुरू असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची आणि रस्ता सुस्थितीत येईपर्यंत टोलवसुली थांबवण्याची मागणी केली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली असून, वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुरावस्थेमुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
हा महामार्ग बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर बांधण्यात आला आहे. या तत्त्वानुसार चांगल्या प्रतीच्या रस्त्यासाठी टोल आकारणे अपेक्षित असताना, सद्यस्थितीत महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एका बाजूला रस्त्यावर मोठमोठे खड्डे असताना, त्याच खराब रस्त्यासाठी टोलवसुली सुरू असणे हे पूर्णपणे चुकीचे धोरण असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावून सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधीक्षक अभियंत्यांना विनंती केली आहे की, चंद्रपूर-नागपूर महामार्गाची तात्काळ आणि प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच, जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी सुस्थितीत येत नाही, तोपर्यंत सदर महामार्गावरील टोलवसुली थांबवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या गंभीर प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक असून, त्यांच्या या प्रयत्नांमुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील प्रवासाचा अनुभव सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे. या पत्राची प्रत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, चंद्रपूर आणि प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण, चंद्रपूर यांनाही पाठवण्यात आली आहे.