मनपा शाळांमध्ये ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम
गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदी समागम वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्यभर विविध शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या संदर्भातील शासन निर्णयाच्या अनुषंगाने मनपा शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता, मानवी मूल्ये व देशहितासाठीचा त्याग यांचा संदेश समजावा यासाठी शहरातील २६ मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादुरजी यांचा पराक्रम, विचार आणि बलिदानाचा इतिहास प्रत्यक्ष संवादातून उलगडुन देण्यात आला. त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रफित शाळांमध्ये दाखविण्यात आली. तसेच चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा व शाळा परिसरात जनजागृती रॅलींचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये ४ हजारहून अधिक मनपा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर एकूण ४ हजार विद्यार्थ्यांपर्यंत गुरूंच्या जीवनविचारांचा संदेश पोहोचला.
शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारात देखील चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन सक्रिय सहभागी झाले असून शहरातील एलएडी स्क्रीन्सवर जीवनगाथेची चित्रफित नियमित प्रसारित करण्यात येत आहे.
तसेच बॅनर, होर्डिंग, सोशल मीडिया पोस्ट्स यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती घेऊन जाण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना मदत होण्याच्या दृष्टीने स्वतः हुन योगदान देणाऱ्या संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे करण्यात येत आहे.



