‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त राज्य समन्वय समितीकडून आढावा
प्रचार पत्रिका आणि स्टीकरचे विमोचन ; नागपूर येथे श्री.गुरू तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
‘हिंद-दी-चादर’ श्री. गुरू तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० वा शहिदी समागमाचा कार्यक्रम नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी होत आहे. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांना याबाबत माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावी, या उद्देशाने राज्य समन्वय समितीकडून मंगळवारी आढावा घेण्यात आला.
नियोजन सभागृह येथे झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, राज्य समन्व्य समितीचे सदस्य किसन राठोड, पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज, सुदाम राठोड, गुरुबिंदरसिंग अरोरा, चरणजित सिंग अरोरा, जसबीरसिंग सैनी, प्रतापसिंग मुलचंदानी, चंदरशेठ लालवाणी, रणजितसिंग बिसनसिंग धोनी, कुलजितसिंग अंधरेले, सदाशिव चव्हाण, संतोष राठोड, सुदाम राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी किसन राठोड म्हणाले, भारतातील सर्व समाज हे गुरू परंपरेशी जोडले आहेत. समाजाच्या कार्यक्रमात राज्य सरकारचा पुढाकार ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे, त्यामुळे समाजाने दहा पाऊले पुढे यावे. श्री. गुरू तेग बहादुर साहिब यांचे बलिदान लोकांपर्यंत पोहचावे. या इतिहासातून नवीन समाज घडावा, इतिहासाची पुर्नबांधणी व्हावी, या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रम होत आहे. यात महाराष्ट्र विशेष असून आपल्या राज्यात तीन कार्यक्रम होणार आहेत. यात पहिला कार्यक्रम नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी, दुसरा मुंबई येथे ३१ डिसेंबर रोजी तर तिसरा कार्यक्रम नांदेड येथे २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित आहे.
समाज जोडण्यासाठी राज्य सरकार समोर आले आहे. या माध्यमातून शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल आणि सिंधी समाज एकत्र येत आहे. हे आयोजन यशस्वी करण्यासाठी आज राज्य समन्वय समितीची बैठक चंद्रपूरात आयोजित करण्यात आली असून लोकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा उत्तम काम करीत आहे. लोकांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, बैठकीची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून मुख्य मंडपामध्ये जाण्यासाठी व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात येत असल्याचे किसन राठोड यांनी सांगितले.
जसबीरसिंग सैनी म्हणाले, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार. श्री. गुरू तेग बहादुर यांनी मानवतेसाठी आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले आहे. आपला इतिहास आपण योग्य प्रकारे समोर आणणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जितेंद्र महाराज म्हणाले, गुरू तेग बहादुर साहिब यांचे बलिदान नेहमी आठवणीत रहावे, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेल्या प्रचार पत्रिका आणि स्टीकरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.



