ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भटक्या पारधी बालकांचे यशस्वी लसीकरण

मनपा आरोग्य विभागाचे यश

चांदा ब्लास्ट

नागपूर रोड परिसरात झोपडी उभारून अगदी काही काळ वास्तव्यास असणाऱ्या, भटकी पारधी जमातीतील लसीकरणापासुन वंचित असलेल्या बालकांचे चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत असलेला त्यांचा विरोध व गैरसमज दूर करतांना आलेल्या अडचणींचा सामना करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली.

  झांशी,भोपाळहून आलेल्या या समाजामध्ये लसीकरणाबाबत भीती होती की, “बाळ लसीकरण केल्यावर आजारी पडते,” म्हणून अनेक कुटुंबे लसीकरण टाळत होती. आरोग्य विभागामार्फत याआधी दोनदा प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या, मात्र संबंधित कुटुंबे घरी न सापडल्यामुळे प्रयत्न अपूर्ण राहिले. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता, आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ भेट देत, त्या ठिकाणी वसलेल्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून, लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांच्या भीतीचे निरसन करण्यात आले. त्यानंतर लगेचच सुटलेली बालके ओळखून त्यांचे लसीकरण करण्यात आले.

   प्रतिकूल परिस्थितीत, समज-गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर योग्य समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडविणे हे आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या, सहानुभूतीपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.प्रभारी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ.अश्विनी भारत, लसीकरण क्षेत्र निरीक्षक सारिका गेडाम व रामनगर येथील शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांद्वारे सदर मोहीम राबविण्यात आली.

“लसीकरण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. भटक्या समाजात लसीविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी थेट संवाद महत्त्वाचा असतो. चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागाने चिकाटी, सहानुभूतीच्या आधारे हा विश्वास निर्माण केला, हे अत्यंत अभिमानास्पद आहे. आरोग्य सुरक्षेची साखळी शेवटच्या घटकापर्यंत मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न कायम सुरू राहतील.”

                    – आयुक्त डॉ.विद्या गायकवाड

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये