ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथील ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!

सुसज्ज इमारत वर्षभरापासून धूळखात उभी ; प्रशासनाचे दुर्लक्ष?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

 हा तालुका अत्यंत मागासलेला असुन येथील जनता दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्यास आहे. येथील दऱ्याखोऱ्यामुळे जनता पायाभूत सुविधेपासून वंचित आहे. त्यातच सरकारी योजना देखील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याची बाबी समोर येत असतानीच, जिवती तालुक्यातील जनतेला अद्यावत आरोग्य सुविधा देण्याचे माजी आमदार संजय धोटे यांचे स्वप्न प्रशासकीय दिरंगाई, स्थानिक लोकप्रतिनिधींची अक्षम्य अनास्था यामुळे धुळीस मिळालेली दिसत आहे. ग्रामीण रुग्णालय भूमी पूजनापासून दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते.

            माजी आमदार संजय धोटे यांनी जिवती तालुक्यातील नागरिकांची आरोग्याची सोय तालुक्यातच उपलब्ध व्हावी या दृष्टीने मोठ्या दिमाखात २ आगस्ट २०१९ रोजी जिवती ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन केले. व नंतरच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने भरभरून मतदान दिले, त्या वेळी जनतेच्या आरोग्या सारख्या मुलभूत प्रश्‍नावर स्थानिक लोकप्रतिनिधी काहीतरी करतील ही भाबडी आशा जनतेच्या मनात होती. जिवती साठी तर दस्तूरखुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न तालुक्यातील जनतेस दाखविले होते. जिवतीचे ग्रामीण रुग्णालय तरी दोन वर्षात पूर्ण होईल ही आशा करणे स्वाभाविक होते. संजय धोटे यांनी भूमिपूजना वेळी दिलेली आश्‍वासने आजही प्रत्यक्षात येऊ शकलेली नाहीत.

              कोविडच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि यंत्रणेचा आधार घेत मोठमोठी जम्बो कोविड रुग्णालये उभी केली. मात्र चार वर्षांपूर्वी निधीसह मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय या पार्श्‍वभूमीवर तातडीने पूर्ण करुन जनतेसाठी खुले होईल या बाबतीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर अनास्थाच राहिली. याचा परिणाम जिवती तालुक्यातील जनतेला भोगावा लागत आहे. कित्येक रुग्ण गंभीर आजाराच्या उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा नजीकच्या तालुक्यांवर अवलंबून आहेत. मात्र तिथेही व्यवस्था न झाल्यास नागपूर, वर्धा, लातूर, नांदेड, आदीलाबाद येथील रुग्णालयांवर अवलंबून राहण्यावाचून पर्याय उरत नाही. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आर्थिक स्थिती असो वा नसो लोक पदरमोड करून अन्य ठिकाणी रुग्णांना घेऊन जातात हे चित्र गेली कित्येक वर्षापासून कायम आहे. या प्रवासात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ओढाताण, शारीरिक-मानसिक त्रास होतो तो तरी टळला असता. मात्र जिवती ग्रामीण रुग्णालय किमान वापरात येईल एवढे तरी कार्यान्वित करावे,अशी इच्छा ना प्रशासनाला कधी झाली, ना येथील लोकप्रतिनिधींना त्याची गरज वाटली. या दुष्टचक्रात जनता मात्र भरडत चालली आहे.

      ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले उद्घाटन हे त्याचेच द्योतक आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास नागरिकांची होणारी हेळसांड थांबून गरजेनुसार योग्य औषधोपचार मिळतील. ह्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे व एक वर्षापासून ही इमारत धूळखात पडून उभी असल्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन राजकीय श्रेय घेण्याच्या वादात तर अडकले नाही ना, अश्या चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आले आहे. त्यामुळे जनतेच्या जीवावर उठणारी ही अक्षम्य दिरंगाई आणखी किती काळ चालणार? आतापर्यंत वेळेवर उपचार न मिळाल्या मुळे अनेक रुग्णाना आपला जीव गमवावा लागला आहे.

जिवती ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने,वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसह कार्यान्वित व्हावे तरच जिवती वासीयांना आरोग्य सेवांच्या बाबतीत दिलासा मिळेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये