ताज्या घडामोडी

आश्रमशाळेतील दुरावस्थेमुळे पळाली ती 5 मुले – शाळेचे वास्तव आले उघडकीस

दिड महिन्यापासून विद्यार्थी खातात केवळ वरण अथवा भाजी भात - शाळा प्रशासनाचे विद्यार्थ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

कालच्या बातमीत आपण वाचले की राजुरा तालुक्यातील एका प्राथमिक आश्रम शाळेतील 5 वी ते 7 वी दरम्यान शिकत असलेले 5 विद्यार्थी पहाटे 4 वाजताच्या सुमारास शाळेतुन पळून गेले. अधरात चिखलवाट तुडवत ट्रक थांबवून ते राजुरा बस स्थानकावर पोचले असता पत्रकाराच्या लक्षात आल्याने त्याने मुलांना शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक राजेश्वर चव्हाण ह्यांच्या स्वाधीन करून सुखरूप शाळेत पोहचविण्यात मदत केली.

प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः जातीने चंदनवाही येथिल स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळेत भेट देऊन परिस्थिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता बस स्थानकावर विद्यार्थ्यांनी पळुन जाण्यामागील सांगितलेल्या कारणांची शहानिशा केली.

सदर शाळा चंदनवाही येथे असुन शाळेत जाण्यासाठी जवळपास दोन शेत ओलांडुन जावे लागते. जाण्यासाठी शेतातील पायवाट आहे. साधा मुरूम टाकून रस्ता सुद्धा करण्यात आलेला नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत चिखल तुडवत शाळेत जावे लागते.

विद्यार्थ्यांनी आपल्याला शाळेत कामे करावी लागतात असे सांगितले होते मात्र शाळेतील शिक्षकांनी ह्या माहितीला खारीज केले. त्यासोबतच विद्यार्थिनी सांगितले होते की, शाळा सुरू झाल्यापासून त्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीचे भोजन अशा तीनही वेळी केवळ वरण भात किंवा भाजी भात देण्यात येतो. शाळेत पोळी देण्यात येत नाही. ह्या बाबीत प्रत्यक्ष भेटीत सत्यता आढळुन आली असुन मुलांना शाळा सुरू झाल्यापासून एकदाही पोळी अथवा इतर काही पदार्थ देण्यात आलेले नाही. नाश्ता म्हणून सुद्धा केवळ भात वरण किंवा भाजीच देण्यात येत आहे व शिक्षकांनी देखिल ही बाब मान्य केली आहे.

शासनाकडून विद्यार्थ्यांच्या न्याहारी व भोजनासाठी निधी दिल्या जातो. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सकाळी दुध बिस्कीट अथवा न्याहारी म्हणून पोष्टिक अन्नपदार्थ देणे अनिवार्य आहे मात्र ह्या निवासी आश्रमशाळेत मुलांना दुध तर दुरच राहिले चहा सुद्धा दिल्या जात नाही. न्याहारी मधे सुद्धा केवळ भात दिल्या जातो. मुलांच्या आहारात फळांचा पत्ताच नाही. आठवड्यातून एकदा अंडी अथवा मांसाहार देण्याचा नियम असुनही विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास एखाद्यावेळी मांसाहार दिला जातो.

 

शाळेतील स्वयंपाक गृहाची स्थिती चिंताजनक असुन अस्वच्छतेचा कळस बघायला मिळत असल्याने मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकगृहात खिडक्यांना गज नाही, लाईटची सोय नाही त्यासोबतच शाळेत असलेले गॅस सिलेंडर रिकामे असुन दररोज चुलीवर स्वयंपाक केल्या जातो.

मुलांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे सदर प्रतिनिधीला आढळून आले असुन प्रत्यक्ष भेटीच्यावेळी मुलांना देण्यात येणारा भात व वाटण्याची भाजी खाण्यास योग्य नसल्याचे आढळुन आले. प्रतिनिधीने मुलांना भोजनात वाढण्यात येणारी वाटण्याची भाजी हातात घेऊन बघितली असता ती भाजी अक्षरशः अर्धवट शिजलेली असल्याचे आढळले. ह्याबाबतीत शिक्षकांनी कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही.

विद्यार्थ्यांना अंघोळ व प्रातर्विधी करण्यासाठी शौचालय व स्नानगृहाची स्थिती देखिल दयनीय असुन शाळेच्या मुख्य इमारतीतून जवळपास 200 मिटर अंतरावर ही व्यवस्था आहे. मात्र तिथेही जाण्यास चिखलातून जावे लागते. कळस म्हणजे ती प्राथमिक आश्रमशाळा असुन सातव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी वसतिगृहात राहुन शिक्षण घेतात मात्र 200 मिटर अनारावर
अंतरावर असलेल्या शौचालयाच्या मार्गावर अथवा शौचालयात विद्युत व्यवस्था नाही त्यामुळे कुणाला रात्रीच्या वेळी गरज भासल्यास अंधारातच जावे लागते. ही शाळा शेतात असल्याने विषारी जीवजंतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत एखाद्या विद्यार्थ्याला दंश झाल्यास किंवा त्याच्या प्राणावर बेतल्यास जबाबदारी कुणाची असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अत्यंत दुरवस्थेत असलेले हे विद्यार्थी जणु जिवावर उदार होऊन शिक्षण घेत असुन कुठल्याही मूलभूत सुविधा ह्यांना प्राप्त करून देण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सकस तर सोडाच पण खाण्यायोग्य आहार सुद्धा दिल्या जात नाही है वास्तव असुन आश्रमशाळेला मान्यता देणाऱ्या समाजकल्याण विभागाचे अधिकारी तपासणी करताना डोळे मिटुन तपासणी करतात का असा संशय घेण्यास वाव आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणारा स्व. वसंतराव नाईक आश्रमशाळा प्रशासनावर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे असून चिमुकल्या विद्यार्थ्यांशी अमानवीय व्यवहार करणाऱ्या संस्थेला निष्कासित करून त्या विद्यार्थ्यांना इतर ठिकाणच्या चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये