सिंदखेड राजा येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा येथे यशस्वीरित्या पार पडले.
आजच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणाची सुरुवात मतदारांच्या पसंतीस उतरलेले प्रा. संजय खडसे आणि सौ. नीता संजय खडसे यांनी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून स्वतःच्या आवाजामध्ये गायलेल्या गीतापासून करण्यात आली, या संपूर्ण गाण्याची संकल्पना प्रा. खडसे यांची आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश माहोर यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये जमलेल्या सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच मागील प्रशिक्षणाची उजळणी करून घेतली. प्रशिक्षण दरम्यान भारत निवडणूक आयोग यांची कायदे,तरतुदी आणि अद्ययावत सूचना यांची माहिती सांगण्यात आली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली, टपाली मतपत्रिका व निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्ज व नमुने यांचा अहवाल भरणे बाबत माहिती सांगण्यात आली. मतदान संकलन केंद्रावर ईव्हीएम तसेच मतदान साहित्य ताब्यात घेणे,सूचीनुसार साहित्य तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी करणे, टपाली मतपत्रिका घेतली असेल तर स्वतःचे मतदान करून घेणे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदानापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सहायक निवडणुक निर्णय अधिकारी माहोर यांनी काल च्या प्रशिक्षणाची उजळणी करून देताना सांगितले कि, मतदान केंद्र उभारणी करणे,अभीरूप (मॉकपोल) मतदान घेणे, कंट्रोल युनिट मधून अभिरुप मतदान नष्ट करणे, VVPAT मधील अभिरूप मतदान चिट्ठया सील करणे याबद्दलची दक्षता घेतली पाहिजे यावर भर दिला. मतदानादरम्यान मतांच्या गोपनियते बाबत माहिती देणे,मतदान सुरू केल्याची घोषणा करणे, मतदान केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनी मध्ये घटनांची नोंद घेणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान स्थिती आकडेवारी कळविणे इत्यादी गोष्टी मतदानादरम्यान करायला पाहिजे याबद्दल मुद्देसूद बातमी दिली.
आज पुन्हा एकदा उजळणी स्वरूपात EVM मशीनच्या वापराबद्दल आणि त्याच्या हाताळणी बद्दल ईव्हीएम प्रशिक्षण कक्षाचे नोडल अधिकारी उद्धव मांटे आणि सहाय्यक नोडल अधिकारी शिवानंद वाकदकर यांनी सर्व मतदान अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर द्वारे प्रत्यक्षपने प्रात्यक्षिक करून ईव्हीएम मशीन कसे हाताळायाचे याचे प्रशिक्षण देण्यात आले, त्या प्रात्यक्षिक कक्षाची पाहणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली डोंगरजाळ यांनी केली, सोबत नायब तहसीलदार सायली जाधव, मतदान अधिकारी श्रीकांत बुलबुले उपस्थित होते.
या दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी काल आणि आज मिळून एकूण 1551 निवडणुक कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
दोन दिवशीय प्रशिक्षणाला तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ ,निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव, निवडणुक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा अस्मा मुजावर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, प्र. नायब तहसीलदार नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.