Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील ट्रॉमा केअर सेंटर त्वरित सुरू करा – चंद्रकांत खरात

आमरण उपोषणाचा दिला इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील ग्रामीण रुग्णालयातील इमारत व यंत्रसामग्रीने सज्ज असलेले ट्रॉमा केअर सेंटर हे तात्काळ सुरू करा. अगोदर त्या सेंटरचे अपंगत्व दूर करा मग ते अपघात.ग्रस्तांसाठी उपलब्ध होईल, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन महाराष्ट्र शासन सामाजिक युवा पुरस्कार प्राप्त तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य चंद्रकांत खरात यांनी मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील अपर मुख्य सचिव मुंबई यांना दिले आहे.

देऊळगाव राजा तालुका हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमारेषेवर आहे, त्यामुळे विदर्भातील तसेच मराठवाड्यातील रुग्ण मोठ्या आशाळभूत अपेक्षेने या रुग्णालयाकडे बघत असतात. ट्रॉमा केअर सेंटर सुरू नसल्यामुळे एखादा अपघातग्रस्त रुग्ण रुग्णालयात आला असता त्याला जालना किंवा छत्रपती संभाजी नगर येथे रेफर केले जाते. वेळीच उपचार मिळाले नाही तर त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

प्रदिर्घ कालावधी पासुन प्रलंबित असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर म्हणून ते सेंटर सुरू करू व पदभरती करू असे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु ते हवेतच विरले आणि ट्रॉमा केअर सेंटर अजूनही बंदच आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी चंद्रकांत खरात यांनी केली आहे.

निवेदनाची दखल घेऊन ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ सुरू करावे व तेथे आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा खरात यांनी दिलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये