Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधानाच्या सन्मानाची ज्योत पेटविण्याचा संकल्प करूया! – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

 चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये माझाही सहभाग आहे. संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपूर्ण देशभर सुरू होत असून यात गोंडवाना विद्यापीठानेही पुढाकार घेतला आहे. समाजाने संविधानानुसार आचरण करत देशाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान अर्पण केले. त्यांच्या या विचारांवर आणि अपेक्षेवर कृती करण्यासाठी आपण सर्वजण संविधानाच्या सन्मानाची ज्योत पेटवण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने प्रियदर्शनी सभागृहात संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्रीराम कावळे , प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा, गुरूदास कामडी, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. दिलीप बारसाकडे आदी उपस्थित होते.

2 ऑक्टोबर 2011 रोजी गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्यात माझाही वाटा आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विद्यापीठ अभिनंदनास पात्र आहे. देशाचा गौरव वाढविण्यासाठी प्रत्येकाने संविधानानुसार आचरण करणे हेच डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते. संविधानातील अधिकारापेक्षा आपले कर्तव्य, जबाबदारी आणि दायित्व यालाही महत्त्व देणे आवश्यक असून बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संविधान मानणारा वर्ग तयार करणे आज काळाची गरज आहे.

देशाला सुधरवायचे असेल तर पहिले आपण स्वतः सुधरायला पाहिजे. या देशातील संविधान हे कोणीच बदलू शकत नाही. विशेष म्हणजे दुर्बल, शोषित, वंचित या सर्व समाजघटकांना न्याय देणारा मुख्य आधार हा संविधानच आहे. या संदर्भात विद्यापीठाने जागृती निर्माण करावी. संविधानाचा अर्थ संस्कारीत लोकशाही असा असून काहीजण मात्र स्वैराचारी लोकशाहीसाठी प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येते. केवळ पुस्तक हातात घेणे म्हणजे संविधानाचा सन्मान नव्हे तर त्यानुसार कृती करणे, समानता मानने, संविधानातील तरतुदींचा सन्मान करणे आणि त्या आचरणात आणणे, याचा विचार प्रत्येकाला करावा लागेल.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सर्वसामान्यांच्या हक्काशिवाय हा देश पुढे जाऊ शकणार नाही, हे मूलभूत कर्तव्यामध्ये लिहिले आहे. संविधानाच्या तरतुदीनुसारच प्रत्येकाने वागणे अपेक्षित असून संविधानाचा सन्मानच देशाला सुधारण्याचा एकमेव मार्ग आहे. जगण्याचा संकल्प दृढ करायचा असेल तर प्रेमाची ज्योत चेतवावी लागेल. हा संकल्प या संविधान सन्मान महोत्सवातून आपण सर्वांनी करावा आणि आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी. नागपूर आणि चंद्रपूर हे देशात दोन जिल्हे सर्वात भाग्यशाली आहे की, या जिल्ह्यांमध्ये डॉबाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली. संविधानाच्या सन्मानाची ज्योत निरंतर पेटविण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. तसेच हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये, यासाठी सातत्याने काम करावे. काही मदत लागल्यास त्यासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही सुद्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून गोंडवाना विद्यापीठाला आवश्यक असलेल्या होस्टेल उभारणीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. संविधान जनजागृतीसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने आयोजित केलेला हा महोत्सव निश्चितच गौरवास्पद असून अध्यासानचे काम अविरत चालू रहावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाला निधी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.संविधान माणसाला जगण्याचा मार्ग दाखवते. भारताचे संविधान हे जागतिक पातळीवर गौरविले जात असून आज कोणतीही ताकत भारताचे संविधान बदलू शकत नाही.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. शिला नरवाडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप बारसाकडे यांनी केले. संचालन डॉ. हेमराज निखाडे यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये