Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंदी सर्व स्थानिक भाषांची मैत्रीण! – डॉ. श्रीराम परिहार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

{यशवंत महाविद्यालयात हिंदी भाषा सप्ताह निमित्ताने भाषा क्लबची स्थापना}

        भारतामध्ये प्रामुख्याने बंगाली, गुजराती, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलगू, मराठी, मैथिली इत्यादी भाषा मोठ्या प्रमाणामध्ये बोलल्या जातात. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण भारतातील 22 भाषांचा उल्लेख आलेला आहे. यापैकीच 14 सप्टेंबर रोजी भारतीय संविधान सभेने हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता दिलेली होती. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. हिंदी भाषा आणि इतर बोलल्या जाणाऱ्या भाषा यांच्यामध्ये कुठलाही वाद नाही, त्यांच्यात स्पर्धा नाही, उलट इतर भाषा हिंदी ला बळ देण्याचे कार्य करते या अर्थाने हिंदी भाषा इतर भाषांची मैत्रीण आहे. असे मत डॉ. श्रीराम परिहार, सुप्रसिद्ध ललित निबंधकार तथा माजी प्राचार्य, मध्यप्रदेश, उच्च शिक्षा विभाग, यांनी व्यक्त केले. ते यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे आयोजित हिंदी भाषा सप्ताह निमित्ताने बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य, डॉ. गिरीश ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेमचंद्र वैद्य, प्रधानमंत्री, राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा, डॉ. दिनेश काळे, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, मुंबई, डॉ. प्रियदर्शनी देशमुख, गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार, डॉ. एन. एच. खोडे, मराठी विभाग प्रमुख, कार्यक्रमाचे समन्वयक, डॉ. संजय धोटे उपस्थित होते.

       कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना डॉ. श्रीराम परिहार यांनी, हिंदी भाषा सर्वसमावेशक, व्यापक असून जगातील इतर भाषांच्या तुलनेत अतिशय आशयघन अशी आहे. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. गिरीश ठाकरे यांनी हिंदी भाषा ही आपली संस्कृती, भावना, आकांक्षा आणि आदर्श यांचे प्रतीक आहे. आपण देशाच्या इतर भागात गेल्यानंतर प्रामुख्याने हिंदीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतो. हिंदी मुळे आपली राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागत असते. असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉक्टर दिनेश काळे लिखित “विश्वशांती कवितेतील विश्वात्मकता” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे की, राज्यघटनेत नमूद केलेल्या सर्वच्या सर्व 22 भाषांमध्ये तसेच काही इतर देशातील भाषांमध्ये त्या कवितेचा अनुवाद करण्यात आलेला आहे.

            याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आपले विचार व्यक्त करताना डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी, भारतात जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोक आज हिंदीचा वापर करताना दिसतात. त्यामुळे हिंदी ही केवळ भाषा नसून ते एक संपर्क साधण्याचे माध्यम आहे. त्यामुळे या ऐतिहासिक भाषेबद्दल आदर व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते, असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून आपले विचार व्यक्त करताना डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी, डॉ. दिनेश काळे लिखित “विश्वशांती कवितेतील विश्वात्मकता” या कविता संग्रहावर आपले विचार व्यक्त केले. तसेच त्या कविता संग्रहाचे संपादनही त्यांनीच केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देण्याचे कार्य डॉ. संजय धोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम विश्वास यांनी तर आभार प्रदर्शन नाजमीन शेख यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. रवींद्र बेले, प्रा. संदीप चव्हाण, डॉ. दीपक महाजन, प्रा. बुद्धघोष लोहकरे, प्रा. सचिन वागदे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                       प्राचार्य  डॉ. गिरीश ठाकरे,  यशवंत महाविद्यालय, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये