भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा खा. धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट
भद्रावती शहरातील राजकारणाला आज काँग्रेस पक्षाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण वळण दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे तीन महत्त्वाचे माजी पदाधिकारी तथा माजी नगरसेविका लीला ढुमणे, माजी नगरसेविका प्रतिभा निमकर आणि माजी नगरसेवक देविदास पाझारे यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भद्रावतीमध्ये काँग्रेस पक्षाची जनशक्ती आणि राजकीय प्रभाव वाढला आहे.
जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आणि आपापल्या प्रभागात मजबूत पकड असलेल्या या सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, जनतेच्या सेवेत सक्रिय असलेल्या या सर्व सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसला मिळणारे यश अधिक भव्य असेल. “ज्या सहकाऱ्यांनी समर्पित भावनेने आपल्या प्रभागाची सेवा केली आहे, त्यांना काँग्रेस पक्षात योग्य सन्मान मिळेल आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहर विकासासाठी होईल,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांना सोबत घेऊन भद्रावती शहराच्या विकासाची नवी दिशा निश्चित करेल, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
या महत्त्वाच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार, प्रवीण काकडे यांच्यासह मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही आवर्जून उपस्थित होते. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कुशाल मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुनाज शेख आणि महिला काँग्रेसच्या सरिता सूर यांचा समावेश होता. मित्रपक्षाच्या नेत्यांनीही या एकीचे स्वागत करत आगामी निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना संघटनेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



