ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राचा महसूल तेलंगणाच्या तिजोरीत?

जिवती–येल्लापूर–आदिलाबाद मार्गे ‘लालपरी’ची बसफेरी सुरू करा - सामाजिक कार्यकर्ते दिपक साबने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण व पश्चिम भागाला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने सीमावर्ती भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर तेलंगणा राज्य परिवहनच्या बससेवेचा लाभ घेत आहेत. मात्र या बसफेऱ्यांमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांकडून मिळणारा महसूल तेलंगणा सरकारच्या तिजोरीत जमा होत असल्याची चर्चा सुरू असून, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही या मार्गावर तातडीने बसफेरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

सद्या तेलंगणा राज्यातील उटनूर व आदिलाबाद आगाराच्या बस जिवती तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शेणगावपर्यंत धावत आहेत. उटनूर–येल्लापूर–जिवती–शेणगाव तसेच आदिलाबाद–येल्लापूर–जिवती–शेणगाव या मार्गांवर दररोज सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री अशा दिवसातून चार वेळा बसफेऱ्या सुरू आहेत. विशेष म्हणजे उटनूर डेपोची ही बस त्या आगारातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बसांपैकी एक वर्षानुवर्षे ठरत आहे.

जिवती तालुक्यातील नागरिकांना मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड व परभणी जिल्ह्यांकडे जाण्यासाठी जिवती–येल्लापूर मार्गे आदिलाबाद हा मार्ग तुलनेने कमी अंतराचा असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होत आहे. त्यामुळे तेलंगणा राज्य परिवहनच्या बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राजुरा–गडचांदूर–जिवती–येल्लापूर–आदिलाबाद या मार्गावर ‘लालपरी’ बसफेरी सुरू केल्यास सीमावर्ती भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसुलातही वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक साबने यांनी मुख्यमंत्री व राज्य परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी ते २०२२ पासून सातत्याने करीत आहेत. संबंधित मार्गावर बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊन राज्य परिवहनला आर्थिक लाभ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये