अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर वन अकादमी अव्वल
चांदा ब्लास्ट
देहराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या २८ व्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वनविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत देशात ४ था क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राने एकूण ७७ पदके यात ३१ सुवर्ण, २६ रौप्य, २० कांस्य पदके जिंकत २८६ गुण मिळवले.
या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्रातील सहा वनप्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा वाटा असून त्यांनी एकट्याने २७ पदके जिंकली. यात ९ सुवर्ण, १० रौप्य व ८ कांस्य पदकांचा समावेश आहे. धावण्याच्या विविध स्पर्धा, रिले, मेरेथॉन, लॉग जंप, रेस वॉकिंग, जॅव्हलिन भो, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यावरून राज्यातील वनप्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणाची उच्च गुणवत्ता सिद्ध होते.
चंद्रपूर वनअकादमीने सर्वाधिक १० पदके जिंकत (६) सुवर्ण) आघाडी घेतली. अजय पठारे (१०० मी. व २०० मी. दुहेरी सुवर्ण), जगदीश बरेला (लॉग जंप) आणि साक्षी पवार (महिला २१ किमी रेस) यांनी चमकदार कामगिरी करत चंद्रपूर वन अकादमीला गौरव मिळवून दिला. शहापूर वन अकादमीने ५ पदके (४ सुवर्ण, २ रौप्य) जिंकत दुसरा क्रमांक मिळवला. अखिल जाधव २५ किमी मॅरेथॉन सुवर्ण) आणि हिमानी धनारे (वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग दोन्ही सुवर्ण) हे प्रमुख विजेते ठरले. चिखलदरा वन अकादमीने सातत्यपूर्ण कामगिरी करत ७ पदके (३ रौप्य, ४ कांस्य) पटकावली. यामध्ये सोमिका मंचेकर, नेहा पिंगडे आणि संकेत मसाने यांनी मध्यम अंतर स्पर्धामध्ये चमक दाखवली. जालना अकादमीने रोहिणी पाटील यांच्या उत्कृष्ट धावण्याच्या कामगिरीच्या बळावर ३ रौप्य पदकांचे योगदान दिले.
महाराष्ट्र वनविभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व क्रीडापटू, प्रशिक्षक व प्रशिक्षण अकामींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची शिस्त, टीमवर्क आणि समर्पण हीच खऱ्या अर्थाने वनसेवेची ओळख आहे, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.



