मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीला गती, २५ डिसेंबरपर्यंत होईल पूर्ण!
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे महत्त्वपूर्ण निर्णय

चांदा ब्लास्ट
आ. श्री. मुनगंटीवार यांची भेट घेत कार्यकारी अभियंता यांनी दिली माहिती
मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर बीटी पॅचवर्क, ओव्हरले आणि थर्मो प्लास्ट पेंटिंग
नागरिक, विद्यार्थी आणि आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा
चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग (एन.एच. ९३०) दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २५ डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होणार असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी व आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या संदर्भातील कामाच्या प्रगतीबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. केळकर यांनी आज, मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी आमदार श्री. मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिली. यापूर्वी आ. मुनगंटीवार यांनी नागपूर येथे विकासपुरुष केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले, याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
श्री केळकर यांनी सांगितले की, मूल ते बंगाली कॅम्प / सावरकर चौकापर्यंत एकूण ३९.६७४ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती सोबत रस्त्यावर बीटी पॅचवर्क, ओव्हरले वर्क आणि थर्मो प्लास्ट रोड मार्किंगचे काम करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे वाहतुकीची क्षमता वाढेल आणि रस्त्याची सुरक्षितता अधिक मजबूत होईल.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी नागपूर येथे केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत ना.नितीनजी गडकरी यांनी तातडीने संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कामाला सुरुवात झालेली असून आज राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. केळकर यांनी आज आमदार मुनगंटीवार यांची जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती दिली.
मुल-चंद्रपूर महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या मार्गावरून सामान्य नागरिक, विद्यार्थी, उद्योग, आपत्कालीन सेवा (ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड) यांना त्रास सहन करावा लागत होता. या परिस्थितीत रस्त्याचे लवकर पूर्ण होणारे काम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महामार्ग फक्त रस्ता नाही, तर मुल आणि चंद्रपूरच्या आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक प्रगतीचा मुख्य दुवा आहे. नागरिकांची सुरक्षित व सुलभ वाहतूक सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती कामाला तात्काळ निर्देश दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.



