तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या वृद्ध महिलेचा जंगलात आढळला मृतदेह
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
तालुक्यातील पद्मापूर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यमुना बाजीराव मडावी (७०) या वृद्ध महिलेचा मृतदेह आज सकाळी शेतशिवाराजवळील नर्सरीमध्ये आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पद्मापूर येथील रहिवासी असलेल्या यमुना मडावी या घर झाडण्यासाठी लागणारे ‘झाडणे’ (केरसुणीसाठी लागणारे साहित्य) गोळा करण्यासाठी गावातील शेताशेजारील जंगल नर्सरीत गेल्या होत्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. सलग तीन दिवस शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नव्हता. अखेर, आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. वनविभागाच्या वतीने मृताच्या कुटुंबीयांना २२५,००० ची सानुग्रह आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
पुढील सविस्तर तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित मदतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मृतक यमुना मडावी यांच्या पश्चात दोन अपत्ये असून त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पद्मापूर आणि परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये वाघाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.



