चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (NH-353D) वरील बेटाळा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चौगान येथील रहिवासी पांडुरंग सदाशिव मातेरे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज दिनांक २५ नोव्हेंबरला सकाळी १०.४५ वाजता सुमारास उघडकीस आली
प्राप्त माहितीनुसार, पांडुरंग मातेरे हे सकाळी किन्ही येथील मिनी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. काम आटोपून सायकलवरून सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास गावी परत जात असताना आरमोरीकडून ब्रम्हपुरीकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर टेम्पोचालक वाहनासह परत फिरत आरमोरीच्या दिशेने पसार झाला. अपघातग्रस्त वाहनाची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण करीत आहेत.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून टेम्पोचालकाचा शोध घेण्यास पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.



