कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या ट्रकचा अपघात
१७ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोटवार
मूल : कत्तलीसाठी जनावरे कोंबून नेणाऱ्या ट्रक (गाडी क्रमांक सी.जी -०७ सी.बी – ०७१५)चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गडचिरोली-मूल मार्गावरील आकापुर गावाजवळील वळणावर ट्रक उलटला.यात जवळपास १७ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता दरम्यान घडली.घटनास्थळावरुन ट्रक चालक फरार झाला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
गडचिरोली वरून हैद्राबाद येथे कत्तलीसाठी गाय,बैल व कालवड असे एकूण १७ जनावरे ट्रक मध्ये कोंबून नेत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.त्यामुळे गडचिरोली मूल मार्गावरील वळणावर ट्रक उलटला.त्यामुळे एकूण १७ जनावरे मृत्यू पावले.अपघाताची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले.वाहनाची तपासणी केली असता ट्रकच्या डाल्यामध्ये गाय,बैल जातीचे जनावरे पाय बांधून एकावर एक असे मृतावस्थेत आढळून आले.पोलिसांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून जनावरांचे शवविच्छेदन केले व एमआयडीसी परिसरात जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून जमिनीत पुरण्यात आले.जनावरे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अंदाजे १० लाख रुपये किंमतीचा ट्रक (गाडी क्रमांक सी.जी -०७ सी.बी – ०७१५)जप्त करण्यात आला आहे.
मात्र ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला.फरार चालक तसेच मालक यांच्यावर कलम २८१, ३२५ भारतीय न्याय सहिंता सहकलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम ५,९,११ प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियम चे कलम ११(१) (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहेत.