जिवती येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन शांततामय वातावरणात साजरा
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाचे शहरात शिस्तबद्ध पथसंचलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जिवती येथे भारतीय बौद्ध महासभा, जिवती तालुका व शहर शाखेच्या वतीने १ जानेवारी २०२६ रोजी शांततामय व संविधानिक पद्धतीने समता सैनिक दलाचे शहरात शिस्तबद्ध पथसंचलनासह शांततामय वातावरणात भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला.
दुपारी १२ वाजता पंचशील बुद्ध विहार येथे आयु. शरद वाटोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर पंचशील बुद्ध विहारापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध व अनुशासित पथसंचलन पार पडले. या पथसंचलनाने शहरात सामाजिक ऐक्य, शिस्त व संविधानिक मूल्यांचे दर्शन घडविले. पथसंचलनादरम्यान वीर बाबुराव शेडमाके, छत्रपती शिवाजी महाराज, संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याना सलामी देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव विजयस्तंभास अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. किशोर तेलतुंबडे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आयु. नभिलास भगत यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांच्या वतीने पथसंचलनाचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. तसेच भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वंचितच्या तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्य मार्गदर्शनपर कार्यक्रम शहर उपाध्यक्ष नभिलास भगत यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
तर उद्घाटन तालुकाध्यक्ष दिपक साबने यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु. किशोर तेलतुंबडे, सामाजिक कार्यकर्ते आयु. डॉ. प्रा. सोमाजी गोंडाने यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व तसेच भारतीय संविधानातील समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
तसेच कोरपना तालुकाध्यक्ष श्रावण जिवणे, समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर बादल चांदेकर व जिवती शहर सरचिटणीस शरद वाटोरे यांनी विचार मांडले यावेळी प्रामुख्याने भा.बौ.म.जिल्हा सरचिटणीस संदीप सोनोने, चंद्रपूर शहराध्यक्ष भाऊराव दुर्योधन, चंद्रपूर शहर उपाध्यक्ष बहादुरे, मधुकर चुनारकर, लिंबादास पतंगे, देविदास साबने, गणेश कांबळे, तांबरे, बालाजी सोनकांबळे, अमोल कांबळे, दिलीप जिवणे, गिरीश कांबळे, विश्रांत साबने यांचेसह मोठ्या संख्येने समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.
प्रास्ताविक दिपक साबने यांनी केले. सूत्रसंचलन व्यंकटी कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.चंदू रोकडे यांनी केले. शेवटी सामूहिक संकल्प घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



