रेती वाहतुकी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार : रेती वाहतुकीस अभय तर ग्रामस्थांना मरण
रस्ता दुरस्ती होईपर्यंत पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे दिले होते आश्वासन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील पिपरी, कोच्ची, तेलवासा, ढोरवासा ते भद्रावती मार्गाच्या जीवघेण्या दुरावस्थे विरोधात शिवसेना शिंदे गटाचे युवा संघटक मुन्नेश्वर बदखल यांनी दिनांक.१६ ते १९ जानेवारी पर्यंत आमरण उपोषण केले होते. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने क्षेत्राचे आमदार करन देवतळे यांनी बदखल यांच्या मागण्याची दखल घेत लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या उपस्थितीत दिनांक १९ जानेवारी रोजी दिले होते. व येत्या काही दिवसातच या मार्गाच्या कामास सुरू करण्याबाबत बांधकाम अभियंत्यास सूचना दिलेल्या होत्या. मात्र दिलेल्या आश्वासनाचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना हि विसर पडला. त्यातच भद्रावती तहसील येथे वादग्रस्त ठरलेले तहसीलदार पुनश्च: रूजू होताच योगायोगाने रेती वाहतुकीस जोर चढला.
आमरण उपोषण काळात वेळ मारून नेत आमरण उपोषणाची सांगता केली खरी मात्र दिलेला शब्द पाळण्यात कुचराई व दिरंगाई केल्याने आज व्हॅलेंटाइन च्या दिवशी १४ तारखेला सुमठाना येथील विकास सातघरे हा युवक जीवघेण्या अपघातात गंभीर दुखापतग्रस्त होऊन चंद्रपूरला मृत्यूशी झुंज देत आहे.
झालेला गंभीर अपघात, तसेच विद्यार्थ्यांच्या १० वी १२ वी च्या परीक्षा, तद्वतच लोक प्रतिनिधीं व पोलिसांचे रेती वाहतुकीस अभय यामुळे संतप्त होत शिवसेनेचे तालुका संघटक मुन्नेश्वर बदखल, तेलवासा सरपंच आकाश जुनघरी , कोच्चीचे सरपंच महेंद्र भोयर व पंचक्रोशीतील विद्यार्थी व पुरुष स्त्रियासह दिनांक १४ रोजी सायंकाळी पाऊणे सात वाजता रस्त्यावर उतरून रेती वाहतूक अडवून धरली. व प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. आंदोलक व रेती वाहतूकदार यांच्यात घमासान होऊन मोठा तणाव निर्माण झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मरण आले तरी बेहत्तर पण हटणार नाही अशी भूमिका मुनेश्वर बदखल यांनी घेतल्याने भद्रावती पोलिस स्टेशन चे एपीआय संजय मिश्रा, मेजर राम सोयाम व त्यांच्या पथकाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र रेती वाहतुकीस अभय देणाऱ्या तहसील, व पोलिस प्रशासनाचा निषेध करीत जमाव आक्रमक होत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. पर्यायाने मेजर राम सोयाम यांचे फिर्यादीवरून भद्रावती पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमांक.२८८ कलम १२६(२)१८९(२)१९१(२) १९० भारतीय दंड संहिता नुसार गुन्ह्याची नोंद करून नामे मुनेश्वर बदखल , श्रीधर आत्राम, अमित जेणेकर, बापूराव बदखल, विशाल, कल्पना बदखल, विजया बदखल यांना अटक दर्शवून सूचना पत्राचे आधारावर सोडण्यात आले. मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याच्या उरफाट्या न्याय प्रणाली मुळे परिसरात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद कुठे मागावी? असा यक्षप्रश्न ग्रामस्थ्यापुढे पडला आहे.
वास्तविकता तपासली असता या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे या मार्गावर मरण स्वस्त झाल्याचा प्रत्यय पावलोपावली येत असल्याने दिवसा सुद्धा पायदळ चालणे कठीण असून रात्री तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने कधी यमसदनी जावे लागेल याची शाश्वती राहिलेली नाही. अशी विदारक जीवघेणी दुर्दशा या मार्गाची झालेली असल्याची वास्तविक परिस्थिती दिसून आली.
सुमठाना मार्गावरून पुढे चिरादेवी ढोरवासा कडे जाताना मध्य रेल्वेच्या पुल तर अक्षरशः नरकाचे द्वार झाल्याचा अनुभव येतो. रेती वाहतुकीतून अर्थकारण साध्य केल्या जात असल्याचा आरोप करीत ग्रामस्थानी अवजड वाहतुकीस अभय देणाऱ्या महसूल, व पोलिस विभागविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.



