टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शेत पाणंद रस्त्यांची कामे हाती घ्या – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेचा आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी पाणंद रस्ते अतिशय महत्वाचे आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण, अतिक्रमण निष्कासित करुन रस्ते वहिवाटीसाठी मोकळे करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेतून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शेत पाणंद रस्त्यांची कामे हाती घ्या, त्यासाठी चांगला आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, बांधकामचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिप बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रेहान खान आदी उपस्थित होते.
शेत पाणंद रस्त्यांना गती देण्यासाठी पुर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने या योजनेतून कामे केली जाणार आहे. ग्रामपंचायतींसह विविध यंत्रणांद्वारे ही कामे केल्या जातील. कामांसाठी २५ किलोमीटर क्षेत्राचा क्लस्टर तयार करुन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या योजनेत तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया देखील सुटसुटीत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अतिशय दिलासा देणारी योजना असून जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे या योजनेतून होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
विविध योजनांच्या अभिसरणातून पाणंद रस्त्यांसाठी निधी उभारण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. त्यासाठी प्रयत्न करुन आपल्या विभागामार्फत अधिकाधिक कामे करण्याचे नियोजन संबंधित यंत्रणेने करावे. पाणंद रस्त्यांवर झालेले अतिक्रमण विशिष्ठ कालावधीत काढून टाकण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहे, अशी अतिक्रमणे असल्यास शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी शासनाने ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा, पोलिस विभागाची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीसह विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या करण्यात आल्या असून त्यांच्या देखील जबाबदारी निश्चित केल्या आहे. या समित्यांनी पाणंद रस्त्यांची यादी करुन आपल्या क्षेत्रातील सर्व पाणंद रस्ते लवकरात लवकर कसे मजबूत होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ.भोयर यांनी केल्या.



