विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्तीचे पालन करावे – प्राचार्य दिलीप मॅकलवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी विजय वासेकर
विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला तर यश नक्कीच संपादन करता येते. आज आपल्या जीवनाची खरी परीक्षा सुरू झाली असून तीच आपल्या भविष्याचा पाया घालणारी आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा कधीही अवलंब करू नका; तो मार्ग घातक ठरू शकतो. शाळा, पालक आणि राष्ट्राच्या नावलौकिकासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून या विद्यामंदिरातून बाहेर पडा.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अपयश आले तरी खचून जाऊ नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जीवनात शिस्तीचे पालन करा; शिस्तीमुळेच आदर्श व्यक्तिमत्त्व घडते, असे प्रतिपादन प्राचार्य दिलीप मॅकलवार यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
तालुका पोंभुर्णा येथील राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्द येथे शैक्षणिक सत्र २०२५–२६ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिक्षकवृंदांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गद्देकार यांनी केले, तर आभारप्रदर्शन लावण्या गद्देकार यांनी मानले.



