चंद्रपूरच्या औद्योगिक वैभवाला नवी दिशा; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकासाची अनेक शिखरे!
चांदा इंडस्ट्रियल इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वारासाठी ३ कोटींचे काम पूर्ण; उर्वरित कामेही मार्गी लावण्याचा निर्धार

चांदा ब्लास्ट
वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांतून चंद्रपूरच्या विकासाला नवी गती; उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आ. मुनगंटीवार यांची ग्वाही
चंद्रपूर – ऐतिहासिक वारशाची समृद्ध परंपरा, औद्योगिक विकासाची क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देत चंद्रपूर शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा ध्यास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने जोपासला आहे. याच विकासदृष्टीचा प्रत्यय चांदा इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामातून आला आहे. तब्बल ३ कोटी रुपये खर्चून ही कामे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. मात्र, या सन्मानाकडे केवळ एका कामाच्या पूर्ततेनंतरचा गौरव म्हणून न पाहता, चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्याच्या व्यापक संकल्पाचा भाग म्हणून पाहिले पाहिजे. शहराचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक सुविधांची उभारणी, शिक्षणाच्या संधींचा विस्तार, आरोग्यसेवेचे बळकटीकरण आणि दळणवळणाच्या सुविधा सक्षम करण्याच्या माध्यमातून चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासाची नवी क्षितिजे अधिक व्यापक करण्याचे प्रयत्न आ. मुनगंटीवार यांनी आपल्या विकासकामांतून पुढे आणले आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चांदा इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते आणि मुख्य प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने आभार व्यक्त करण्यासाठी निमंत्रित केले, याचा मनस्वी आनंद आहे. आपण सर्वांनी केलेले प्रेमळ स्वागत आणि व्यक्त केलेली आपुलकी ही माझ्यासाठी मोलाची आहे. कारण, आयुष्यात शेवटी माणसाच्या सोबत राहते ती त्याने कमावलेली माणसे, त्यांचे प्रेम आणि विश्वास.
एकेकाळी चांदा इंडस्ट्रियल इस्टेट हे चंद्रपूरच्या औद्योगिक वैभवात महत्त्वाची भर घालणारे क्षेत्र होते. मात्र, कालांतराने आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या परिसराच्या विकासाला अपेक्षित गती मिळू शकली नाही. आजही काही कामे पूर्ण होणे बाकी असून, येत्या काही महिन्यांत ती मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. या परिसरातील उद्योजकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, उद्योगांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि चांदा इंडस्ट्रियल इस्टेटने पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, यासाठी मी ठामपणे प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही आ.मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर शहराला ५०० वर्षांहून अधिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड राजे खांडक्या बल्लाळशाह आणि राणी हिराई यांच्या योगदानातून आकाराला आलेल्या या शहराला आधुनिक विकासाची जोड मिळावी, या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पुढे आले आहेत. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वन अकादमी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, सैनिक शाळा आणि बॉटनिकल गार्डन यांसारख्या प्रकल्पांनी जिल्ह्याच्या विकासाच्या विविध क्षेत्रांना नवी दिशा दिली आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रातही नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मूल येथे ५० एकर परिसरात एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र, पॉलिटेक्निक कॉलेज आणि कृषी महाविद्यालय उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येत आहेत. उच्च शिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी बाबूपेठ परिसरात आठ एकर जागेत गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र साकारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
दळणवळणाच्या क्षेत्रात मोरवा विमानतळाचे नूतनीकरण करून त्याचा उडान योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न झाला. बल्लारपूर-मुंबई रेल्वेगाडीला ‘ताडोबा एक्सप्रेस’ हे नाव देण्याच्या उपक्रमातून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख मुंबईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे.या सर्व प्रयत्नांमागे चंद्रपूरला केवळ ऐतिहासिक शहर म्हणून नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यटन आणि दळणवळणाच्या क्षेत्रांत सक्षम असलेले आधुनिक शहर म्हणून विकसित करण्याची व्यापक भूमिका आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
चांदा इंडस्ट्रियल इस्टेटच्या विकासातून स्थानिक उद्योजकांना दिलासा मिळण्याबरोबरच या परिसरातील औद्योगिक घडामोडींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. रस्ते आणि प्रवेशद्वारासारख्या मूलभूत सुविधांची उभारणी ही औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी आहे. त्याचबरोबर उर्वरित पायाभूत सुविधांची पूर्तता, उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण आणि परिसराचा सर्वांगीण विकास या बाबींनाही महत्त्व आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी व्यक्त केलेल्या भूमिकेतून विकासकामांबाबतची पुढील जबाबदारी अधोरेखित झाली. ते म्हणाले की, आज आपण माझे आभार मानले असले, तरी मी याकडे केवळ आभार समारंभ म्हणून पाहत नाही. हा सन्मान म्हणजे पुढील विकासकामे पूर्ण करण्यासाठी मिळालेली ऊर्जा आणि वाढलेली जबाबदारी आहे.
चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवाला आधुनिक विकासाची जोड देणे, औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि स्थानिक उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा विकासाचा प्रवास अधिक गतिमान करण्याचा निर्धार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी महापौर संगीता खांडेकर, डॉक्टर मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, कल्पना पालिकुंडवार,पद्मकुमार नायर, मनोज सिंघवी, रवी लोणकर, सुनीता जयस्वाल, रुद्रनारायण तिवारी यासह इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.



