चंद्रपूर-बल्लारशाह रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला गती द्या ; आ. सुधीर मुनगंटीवार यांचे विभागीय रेल्वे प्रबंधकांना निर्देश
विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग यांच्यासोबत नागपुरात महत्वपूर्ण बैठक; ‘ताडोबा एक्स्प्रेस’सह रेल्वे संबंधित विषयांवर चर्चा

चांदा ब्लास्ट
विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग यांच्यासोबत बैठक; ‘ताडोबा एक्स्प्रेस’सह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
नागपूर : चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे अधिक गतीने पूर्ण करून दोन्ही स्थानके अत्याधुनिक, आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात विकसित करावीत, तसेच प्रवाशांच्या सुविधांमध्ये भरीव वाढ करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयात विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिल्या. ‘ताडोबा एक्स्प्रेस’चे नामकरण, रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ, प्रलंबित रेल्वे प्रकल्प, भूसंपादन, पादचारी उड्डाणपूल आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा करून संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यावर विशेष भर दिला. दोन्ही स्थानकांचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता, प्रवाशांना आधुनिक सुविधा देणारा आणि चंद्रपूर जिल्ह्याची स्वतंत्र ओळख अधोरेखित करणारा असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना त्यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग यांना केल्या.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस नवीन रेल्वेगाडीला ‘ताडोबा एक्स्प्रेस’ हे नाव देण्याच्या प्रस्तावाला गती देण्याची सूचना केली. या रेल्वेगाडीच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनला अंतिम स्वरूप देण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि ताडोबा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून विविध रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविणे आणि पुण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. अधिकाधिक रेल्वेगाड्यांचे प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आले असून, त्यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वर्धा–सेवाग्राम–बल्लारशाह तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची वारंवारता वाढविण्यास अधिक वाव उपलब्ध होईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे स्थानकावरील पादचारी उड्डाणपुलाचे (FOB) काम तसेच बल्लारपूर येथील गोल पुलिया रेल्वे भुयारी मार्गाची सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. गोल पुलिया परिसरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता किंवा उच्च दर्जाचे डांबरीकरण करून नागरिकांची ये-जा अधिक सुरक्षित आणि सुलभ करावी, अशी मागणी त्यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग यांच्याकडे केली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरातील मध्य रेल्वेच्या जमिनीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रकरणात विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात आश्वासन बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बाबूपेठ–सास्ती परिसरातील प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आक्षेपांचे निराकरण करून त्यांना योग्य मोबदला व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच वर्धा–सेवाग्राम–बल्लारशाह तिसऱ्या रेल्वेमार्गिका व डम्पिंग यार्ड प्रकल्पासाठी मौजा बल्लारपूर येथील भूसंपादनाची सद्यस्थिती जाणून घेण्यावरही त्यांनी भर दिला.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील मध्य रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणांच्या प्रश्नावर मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची भूमिका मांडली. संबंधित अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही स्थगित ठेवण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच भाग्यनगर एक्स्प्रेसचा कागजनगर येथून बल्लारशाह–चंद्रपूरपर्यंत विस्तार करण्याच्या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत प्रवाशांच्या सुविधा, रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, शेतकऱ्यांचे हित आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या सर्व बाबींवर एकत्रितपणे भर देत संबंधित विषयांवरील कार्यवाहीचा पाठपुरावा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वेसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग यांनी संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाहीला गती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी याबैठकीला माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, अजय दुबे सदस्य झेडआरयूसीसी मध्य रेल्वे, मुंबई,विभागीय रेल्वे प्रबंधक श्री. विनायक गर्ग आणि रेल्वे विभागाशी संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



