सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे ३४८ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी
दंत किड, फ्लोरोसिससह तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मौखिक आरोग्य कक्ष, दंत विभाग, कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दंतशास्त्र विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ ऑक्टोबर रोजी पाटण येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आणि जिवती येथील शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे दंत व मुख आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.
यावेळी डॉ. पिपरे यांनी विद्यार्थ्यांना सेवा संकल्प अभियानाची माहिती देत मौखिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. दुर्गम व आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दात व हिरड्यांच्या आजारांचे वेळीच निदान, नियमित दंत तपासणी आणि योग्य मौखिक स्वच्छतेच्या सवयींमुळे भविष्यातील गंभीर आजार टाळता येऊ शकतात, असे सांगितले.
दातांची रचना, प्रकार व कार्य, दातांची कीड, दुभंगलेले ओठ, हिरड्यांचे आजार आणि त्यावरील उपचार याबाबत तसेच दात स्वच्छ करण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. विशेषतः तंबाखू, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मौखिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे आणि तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
३४८ विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी
या शिबिरात डॉ. संदीप पिपरे, डॉ. रवींद्र गेडाम आणि डॉ. निखिल शास्त्रकार यांनी पाटण येथील आश्रमशाळेतील २९४ तसेच जिवती येथील वसतिगृहातील ५४ अशा एकूण ३४७ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी केली.
पाटण येथील तपासणीत ७९ विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य असमाधानकारक असल्याचे आढळले. ५२ विद्यार्थ्यांना दातांची कीड, ९ विद्यार्थ्यांना दंत फ्लोरोसिस असल्याचे निदर्शनास आले. तर २५ विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य चांगले असल्याची नोंद करण्यात आली.
जिवती येथील तपासणीत ४२ विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य असमाधानकारक असल्याचे आढळले. ८ विद्यार्थ्यांना दातांची कीड, ३ विद्यार्थ्यांना दंत फ्लोरोसिस असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही विद्यार्थी खर्रा सेवन करीत असल्याचे आढळले, तर १० विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य चांगले असल्याची नोंद झाली.
पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याची कार्यवाही
तपासणीदरम्यान दंत व मुख आरोग्याच्या समस्या आढळलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार मोबाईल डेंटल व्हॅनद्वारे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे संदर्भित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दंत तंत्रज्ञ अरविंद आंबुलकर आणि दंत सहायक सचिन जुमडे यांनी विशेष सहकार्य केले. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, दंतविकारांचे वेळीच निदान करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.



