ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये 35 हजार केशर आंबा लागवड

भेंडवी (ता.राजुरा) येथे जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते आंब्याचे कलम लावून शुभारंभ

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच हरित आच्छादन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘विकसीत भारत ग्रामीण रोजगार व आजिविका हमी योजना’ (व्हीबीजी-राम-जी) आणि जिल्हा खनीकर्म प्रतिष्ठान निधीच्या अभिसरणातून जिल्ह्यातील तब्बल 50 ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी केशर आंब्याची लागवड करण्यात आली. राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केशर आंब्याचे कलम लावून जिल्हास्तरीय शुभारंभ केला.

जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावून केशर आंब्याची लागवड केली.

कोकण कृषी विद्यापीठाकडून 35 हजार दर्जेदार कलमे : या मोहिमेसाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून खास 35 हजार उच्च दर्जाची केशर आंबा कलमे मागवण्यात आली. आंबा कलमांची लागवड शास्त्रीय पद्धतीने व्हावी, यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल यांनी स्वतः चंद्रपुरात उपस्थित राहून ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना व कर्मचाऱ्यांना आंबा लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि संगोपनाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.

दुष्काळ निवारणासाठी श्रमदानातून वनराई बंधारा : केवळ वृक्षारोपणावर न थांबता जलसंधारणाची सांगड घालण्यासाठी राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत रजेवाड यांच्या आवाहनावरून पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. या श्रमदानातून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून कार्यक्रमस्थळी वनराई बंधारा उभारण्यात आला, ज्यामुळे भूजल पातळी वाढून लागवड केलेल्या कलमांनाही लाभ होणार आहे.

यावेळी व्हीबीजी-राम-जी प्रकल्पाचे उपजिल्हा समन्वयक गिरीश धायगुडे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी भागवत रजेवाड, कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल, कृषी अधिकारी महेश वट्टी, सहायक प्रकल्प अधिकारी हेमंत येरमे यांच्यासह भेंडवीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये