ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकशिक्षण संस्थेत वाचक संमेलन

२१-२२ फेब्रुवारीला ग्रंथदिंडी, कविसंमेलन आणि ग्रंथ मेळावा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी. 

राजेंद्र मर्दाने, वरोरा.

     अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या लोकशिक्षण संस्था तर्फे २१ व २२ फेब्रुवारी रोजी लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय वाचक संमेलन व ग्रंथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘असे वाचक घडलो आम्ही’ या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात हा कार्यक्रम होत असून, वाचन चळवळीला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याची माहिती संस्थाध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी लोकमान्य विद्यालयच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

     अधिक माहिती देतांता प्रा. पाटिल म्हणाले की, “वाचक नसेल तर साहित्यालाही अर्थ नाही. वाचक जितका क्रियाशील तितकी समाजाची प्रगती. समाजात वाचन चळवळ, वाचन संस्कृती बळकट व्हावी आणि प्रत्येक घरात ग्रंथ संग्रह निर्माण व्हावे, हीच या उपक्रमामागील भमिका आहे.”

       कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा आयोजक यांनी सांगितले की, २१ फेब्रुवारीला सकाळी ९.०० वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता संमेलनाचे उद्घाटन प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उद्घाटक म्हणून डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कविवर्य इंद्रजीत भालेराव (परभणी) उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री कार्यभार सांभाळणार आहेत. विविध प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधी यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत.

सायंकाळी ५.०० वाजता वाचन चळवळीशी संबंधित उपक्रम राबविणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती होणार आहेत. महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भीमाबाई जोंधळे (‘आजीचे पुस्तकांचे हॉटेल’, नाशिक), अक्षर आनंद उपक्रमाचे विनोद शेंडगे (परभणी) तसेच ‘रीडिंग किडा’ या बालवाचन चळवळीच्या प्रणेत्या डॉ. पल्लवी बापट (नागपूर) सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.०० वाजता ‘आवडलेल्या कथा कथाकारांच्या शब्दात’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येईल.

       २२ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता ‘वाचकाने लिहिते होताना’ या सत्रात डॉ. माधुरी मानवटकर आणि नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपल्या लेखन प्रवासाविषयी संवाद साधतील. सकाळी १०.३० वाजता ‘मैफल कवितांची’ या कार्यक्रमात इंद्रजीत भालेराव कवितांचे सादरीकरण करतील.

या दोन दिवसांत महाराष्ट्रातील विविध प्रकाशकांची पुस्तक विक्री केंद्रे उपलब्ध राहणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी, रसिक वाचकांनी उपस्थित राहून ग्रंथ खरेदी करून वैयक्तिक ग्रंथसंग्रह समृद्ध करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला प्राचार्य जयश्री शास्त्री, मुख्याध्यापक /प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय अंबुलकर, मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, ग्रंथपाल लीना पप्पुलवार इ. ची उपस्थिती होती. आभार डा. प्रशांत खुळे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये