ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वसामान्य नागरीकांच्या कल्याणासाठी शासन कटीबद्ध – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

चारमंडळ येथे जनता दरबारचे उद्घाटन ; विविध कामाचे लोकार्पण व भूमीपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : राज्य शासन सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व शेवटच्या घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासोबतच त्यांच्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्याचे काम करीत आहे. चारमंडळ येथील या जनता दरबारातून सर्वसामान्यांय न्याय मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

सेलू तालुक्यातील चारमंडळ येथील विठ्ठल रुख्मिनी देवस्थान येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार शकुंतला पाराजे, गट विकास अधिकारी देवानंद पानबुडे, चारमंडळच्या सरपंच निता शेळके, अशोक मुडे, प्रफुल खोडे, शिवनगरच्या सरपंच किरणताई अंबुलकर आदी, भाऊराव सोनवने, हिरेश्वर डफरे, गुणवंत कडू, सचिन कडू, प्रवीण करडे, देवेंद्र डफरे, वासुदेव करडे आदी उपस्थित होते.

जनता दरबार आयेाजित करण्यात आलेल्या विठ्ठल रुख्मिनी मंदिराला नुकताच ‘क’ वर्ग तिर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला असून या मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मंदिराच्या सभागृहात केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर गावाच्या विकासाचे विविध उपक्रम देखील घेतल्या गेले पाहिजे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर पुढे बोलतांना म्हणाले.

राज्यात मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार पिककर्जमाफीची मागणी होत आहे. शासनाने जूनपर्यंत पिककर्ज माफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पिककर्ज आहे, अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठी किंवा तहसिल कार्यालयात जमा करावे, जेणे करुन त्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायशी चुकीमुळे काही नावे वगळण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्यावतीने योजनेच्या लाभाचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात अडचणी आल्या. यासाठी ज्या लाभार्थ्यानी चुकीची माहिती सादर केली होती, अशा लाभार्थ्यानी तत्काळ सुधारीत माहिती पोर्टलवर भरावी. लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते मुलींना शाळेत जाण्यासाठी 13 सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत 77 लक्ष 67 हजार रुपये खर्च करुन बांधन्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे व पांदन रस्ता व सिंमेट रस्त्याचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला तालुकास्तरीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये