ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

प्रवेशिका 15 मार्च पर्यंत स्विकारणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. सन 2025 च्या या पुरस्कारांसाठी दि.15 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेले लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांचा समावेश असावा. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर पुरस्कार आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे. पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. समाजमाध्यम पुरस्कार ही स्पर्धा वृत्तविषयक, चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती ही स्पर्धा आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.

विविध विकासकामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार, संपादकांना, पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल. वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती आणि अर्ज dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.

या स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये