स्व.गोविंदा तलांडे स्मृतिप्रीत्यर्थ चिरादेवी येथे काशीमाय यात्रा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या उत्सवाची धूम याच महिन्यात सुरू होते. ग्रामीण जीवनशैली, संस्कृती, विधी आदींचा सुरेख संगम साधत व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत या यात्रा भजन पूजन किर्तन महाप्रसाद आदी सह मोठ्या उत्सवात आयोजित केल्या जातात. पंचक्रोशीतील ग्रामस्थांना हि आगळीवेगळी मेजवानी असते.विविध खाद्यपदार्थ, खेळणी, मनोरंजन इत्यादींची पर्वणी म्हणजे वार्षिक यात्रा उत्सव.
भद्रावती तालुक्यातील चिरादेवी इथे आख्यायिका असलेली काशीमाय यात्रा परंपरेप्रमाणे यंदाही उत्सवात साजरी करण्यात आली. चिरादेवी येथील विनोद उपरे, उपसरपंच प्रदीप देवतळे, शंकर ताजने , महादेव मडावी, राजू खंडाळकर, गजानन आत्राम व चिरादेवी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने हि परंपरा जोपासण्यात आली.
याप्रसंगी हभप सातपुते महाराज व गोरजा येथील गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सुमधुर वाद्य व कीर्तनाने उत्सवाला सुरवात करण्यात आली. धार्मिक कार्यासह सामाजिक बांधिलकी जोपासत याप्रसंगी नवनिर्वाचित तरुण नगरसेवक प्रथम संदेश गेडाम यांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उत्सवाचा शेवट महाप्रसाद वितरण करून करण्यात आला.



