ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष लेख – प्रा.मिलिंदा एक सेवाभावी शिक्षक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

         प्रा.मिलिंदा सुपले सर विश्वशांती व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय सावली या विभागातून नुकतेच नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. प्रा.सुपले सरांनी साडे एकत्तिस वर्षे सेवा केली. विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी एल.अँड टी.स्वीच गेर मुंबई या कंपनीमध्ये दिड वर्षे नौकरी केली. परंतु मुंबईत आई आपल्या जवळ राहण्यासाठी येत नसल्यामुळे त्यांनी आपल्याच परिसरात नौकरी करण्याचा निर्णय घेतला आणि 5 ऑगस्ट 1992 ला विश्वशांती एच.एस.सी.व्ही.सी.विभाग सावली येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून रुजू झाले.

प्रा.सुपले सरांनी शाळेतील विद्यादानासोबतच महाराष्ट्रातील आजच्या समाजसेवकांसोबतही काम केले आहे. त्यामध्ये अन्ना हजारे ,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, गजानन महाराज शेगाव संस्थानाचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील, पोपटराव पवार आदर्श गाव हिवरेबाजार,पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, माधवराव शेवगावकर नांदेड, सप्तखंजेरी वादक तथा प्रसिद्ध किर्तनकार सत्यपाल महाराज, चंदू पाटील मारकवार एवढेच नाही तर मध्यप्रदेशातील माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासोबत सामाजिक चळवळीचे काम एक सच्चा सेवक म्हणून केले आहे.तसेच ज्ञानज्योती फाऊंडेशन सावलीच्या निर्मितीसाठी सरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

प्रा.सुपले सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आयुष्यभर काम करीत आहेत. तसेच गीताचार्य तुकारामदादा,अढ्याळटेकडी यांच्या विचारांचा वसा घेऊन सहकुटुंब काम करीत आहे. यावरून सरांचे समग्र जीवन म्हणजे “यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी” या उक्तीप्रमाणे परिपूर्ण आहे.

“जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा ।दैव तेथेची जाणावा।। या संत तुकारामांच्या अभंगाची आठवण करून देते. स्वामी विवेकानंदांचे वैचारिक साहित्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक घराघरांत सुध्दा पोहचवले आहे. सर गांधी विचारांचे पुरस्कर्ते आहे आणि म्हणूनच सदैव खादी वस्त्र परिधान करून असतात.

शाळेत एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मित्र या पध्दतीनेच सरांचे विद्यार्थ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. सरांनी शालेय व्यासपीठावरील कामगिरी अत्यंत लिलया हाताळली आहे. त्यामुळे सरांची एक वेगळी प्रतिमा आम्हा शिक्षकांच्या हृदयात निर्माण झाली आहे. सरांचे शाळेतील सर्व शिक्षक आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीच्या सर्व सदस्यांशी अगदीच मधुर संबंध आहेत. सरांना कधीही रागावताना आणि भांडण करतांना बघितले नाही परंतु सरांचे मित्र प्रा. नंदकिशोर ओल्लालवार यांच्याशी विचारांवर वाद-विवाद करतांना नेहमी बघितले. या दोघांचाही वादविवाद अगदी टिळक आणि आगरकरांसारखा वाटायचा आणि यात प्रा.सुपले सर आगरकरांच्या भूमिकेत असायचे.

संगीत, विनोद आणि आध्यात्मिक साहित्य सरांना खूप आवडतात आणि हा त्यांचा एक प्रकारचा छंदच आहे. मराठी, हिंदी गीतं कसे ऐकावे ? आणि त्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ आपल्या जीवनातून कसा समजून घ्यावा? हे सरांकडून खूप शिकण्यासारखे आहे.

विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेसंबंधी सरांचे असे मत आहे, की आधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करावे नंतर शिकवावे.विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयातील एच.एस.सी.व्ही.सी.विभागातून पहिला मेरीट इलेक्ट्रॉनिक्स विभागातून आणण्याचा इतिहास सरांनी घडविला. अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या धनीला पुढील आयुष्याच्या आनंदी आणि गुरुमय शुभेच्छा देतो.

__✍️ प्रा.आर.केदार
विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली,जि.चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये