लोकमान्य विद्यालय भद्रावती तर्फे भारत दर्शन शोभायात्रा
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साकारली एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
लोकसेवा मंडळ भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती तर्फे विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक भारत श्रेष्ठ भारत या उदात्त संकल्पनेवर आधारित भारत दर्शन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
भारत म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हे तर भारत म्हणजे संस्कृती, परंपरा, भाषा, कला आणि एकतेचा अद्वितीय संगम असल्याचे या शोभायात्रेतून दाखवून दिले, शोभा यात्रेची सुरुवात मंगल शंखनाद व पारंपारिक वाद्याच्या गजरात भारत मातेला वंदन करून झाली.
शोभायात्रेच्या उद्घाटन प्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव उल्हास भास्करवार,शाळा समिती अध्यक्ष गोपाल ठेंगणे, प्रमुख अतिथी डॉक्टर प्रवीण केशवानी,अविनाश सिद्धमशेट्टीवार, नकुल शिंदे, माजी सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, सदस्य आशिष गुंडावार, संजय पारधे, उमाकांत गुंडावार, संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन सरपटवार, प्राचार्य रूपचंद धारणे ,पर्यवेक्षक आशुतोष सुरावार व ज्ञानपीठच्या प्राचार्य पुनम ठावरी व अन्य अतिथी याप्रसंगी उपस्थित होते.
शोभायात्रा प्रसंगी विविध राज्याच्या वेशभूषेत विद्यार्थी तसेच लोकसेवा मंडळाचे पदाअधिकारी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी फेटे परीधारण केले होते. शोभा यात्रेला विद्यालयापासून सुरुवात झाली. मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.
या प्रसंगी मुख्य रस्त्याच्या बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी उपस्थित असलेल्य नागरिकांनी सतत शोभायात्रेवर पुष्प वर्षाव केला. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना शोभायात्रेप्रसंगी हारार्पण करण्यात आले.
शोभायात्रेत राज्यनिहाय भारत दर्शन साकारण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा महाराष्ट्र व तेथील शौर्य ,संत परंपरा आणि सामाजिक समतेची भूमी यापासून शोभायात्रेला सुरुवात झाली.
त्यानंतर गुजरातचा व्यापार विकास आणि उत्सव प्रिय संस्कृती, राजस्थानचा शौर्य स्वाभिमान आणि लोककलेची समृद्ध परंपरा ,पंजाब येथील शेतकऱ्यांची मेहनत व शूरवीरांचा देश ,हरियाणा ही खेळाडूंची भूमी ,मेहनती लोकांचा प्रदेश, उत्तर प्रदेश मध्ये रामभूमी ,गंगा यमुनेची संस्कृती, बिहार मधील ज्ञान विकास आणि प्राचीन विद्येचे केंद्र, मध्य प्रदेश भारताचे हृदय स्थान ,छत्तीसगड आदिवासी लोकसंस्कृती यांनी निसर्ग सौंदर्याची प्रतीक, यासह इतरही राज्यांचे सौंदर्य आणि विशेष महत्त्व प्रतिपादन करणारे विविध फलक या शोभायात्रेत दाखविण्यात आले.
इतके विविध राज्य,भिन्न भाषा वेशभूषा, नृत्य आणि संगीत तरीही एकच ओळख. आपण भारतीय आहोत. ही शोभायात्रा विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कृती बद्दल आदर आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी ठरली. अखेर सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी एकत्र येऊन एकता बंधुभाव आणि शांततेचा संदेश देत होते .ही शोभायात्रा पाहतांना भारताबद्दल स्वाभिमान सगळ्यांच्या मनात अधिक दृढ झालेला होता. भारत मातेच्या जयघोषाने परिसरातून गेला.



