महाकाली महोत्सवात पलक मुच्छल यांच्या स्वरातून साकारले भक्तीचे सुरेल दर्शन
९९९ मायमाऊलींचा सन्मान, पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची महोत्सवाला भेट

चांदा ब्लास्ट
भक्तिरसाच्या अखंड झऱ्याने ओथंबलेल्या श्री माता महाकाली महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांच्या गोड सुरांनी वातावरण भारावून गेले. त्यांच्या स्वरातून उमटलेली प्रत्येक ओळ भक्तांच्या अंतःकरणातील प्रार्थना ठरली. यावेळी पलक मुच्छल यांनी ही आपल्या भक्तिसंगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते 999 ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, डॉ. विजय देवतळे,माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त जयश्री कापसे, बलराम डोडाणी, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपचे जेष्ट नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, वंदना हातगावकर, रवी गुरुनले, अरुण तिखे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांच्या सुरेल भक्तीगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी माता महाकालीची महाआरती पार पडली. मंद वार्यात हेलकावणाऱ्या पताकांप्रमाणे शेकडो भाविकांचे मन पलक मुच्छल यांच्या गाण्यांच्या लयीवर झुलत होते. जय माता दी च्या घोषणांनी महोत्सवाचे वातावरण अधिकाधिक पवित्र झाले. संगीताच्या दरबारात स्वरांच्या आरतीने मातेचे पूजन भाविकांना घडले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरतीनंतर ११ वाजता महिलांचे जागर कवितेचे कवी संमेलन पार पडले. यात कवयित्रींनी कवितांच्या माध्यमातून जनजागृती करत मातेची भक्ती केली. दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित ९९९ ज्येष्ठ मायमाऊलींचा पालकमंत्री डॉ.प्रा अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी ना. उईक यांनी चित्र प्रदर्शनिचे उद्घाटन केले. त्यानंतर ना. उईक आणि आमदार करण देवतळे यांच्या हस्ते माता महाकालीची आरती करण्यात आली. दुपारी ३ वाजता स्थानिक कलावंतांचा नृत्यजल्लोष कार्यक्रम पार पडला.
माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – ना. उईके
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून सदर महोत्सवाच्या माध्यमातून येथील संस्कृती देशभरात पोहोचवली जात आहे. महोत्सवात भक्तीसह सामाजिक उपक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे.राजकारणात समाजकार्य करणारे नेते म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख असून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार जोरगेवार प्रयत्न करत आहे. मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत, असे या कार्यक्रमात बोलताना आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके म्हणाले.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारे हे मातेचे मंदिर आहे. मातेच्या आशीर्वादामुळे आम्ही आज सक्षम आहोत. नवरात्र हा नारीशक्तीचा उत्सव असून या महोत्सवाच्या माध्यमातून नारीशक्तीचा सन्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाकाली महोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा श्वास आणि समाजाची ताकद आहे. देवीची आराधना ही स्त्रीशक्तीचे, मातृत्वाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. महाकाली म्हणजे अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि सत्यासाठीची निष्ठा आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो; विविध जात, धर्म, भाषा असलेले लोक एका मातेच्या छत्राखाली नतमस्तक होतात हीच खरी भारतीय संस्कृती आहे. महोत्सवाच्या काळात आयोजित होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीतांचे गायन, धार्मिक विधी आणि सामाजिक उपक्रम हे आपल्या समाजाला नवचैतन्य देणारे आहेत. या परंपरेतून आपल्या पिढ्यांना श्रद्धा, शिस्त आणि सामूहिकतेचा धडा मिळतो, असे सांगत त्यांनी महाकाली महोत्सवातील विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले.
उद्याचे कार्यक्रम
सकाळी ९ वाजता श्री माता महाकाली आरती व महेश भजन मंडळाचे भजन
दुपारी लखमापूर हनुमान मंदिर यांच्या वतीने सुंदरकांडाचे आयोजन
संध्याकाळी आरतीनंतर रात्री ७ वाजता फिल्मफेअर पुरस्कृत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका साधना सरगम यांचा भक्ती संगीत कार्यक्रम