सहकाराच्या बळावर मत्स्य व्यवसायाला नवी उंची देऊ शकतो : जयदीप पाटील

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
“सहकाराच्या बळावर मत्स्य व्यवसायाला नवी उंची देणे शक्य आहे. आपली एकजूट, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या माध्यमातून मच्छिमार समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो,” असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय सदस्य तथा उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक जयदीप पाटील यांनी केले.
सहकार भारती मत्स्य सहकारी संस्था प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश, अंतर्राष्ट्रीय सहकारी परिषद, राष्ट्रीय सहकारी विकास निगम तसेच जिल्हा मच्छिमार सहकारी संघ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा व चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्व. जतीराम बर्वे सभागृह, एकलव्य वस्तीगृह, मूल रोड, चंद्रपूर येथे पार पडला.
आपल्या भाषणात जयदीप पाटील म्हणाले की, मत्स्य व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सहकाराच्या माध्यमातून या क्षेत्रात अधिक प्रभावी प्रगती साधता येते. मत्स्य सहकारी संस्थांनी उत्पादनाबरोबरच व्यवस्थापन, विपणन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक शिस्त यावर भर देणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात वैज्ञानिक पद्धतीने मत्स्यपालन, जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन तसेच गुणवत्तापूर्ण बियाणे व खाद्य यांचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळू शकते.
तसेच बाजारपेठेतील चढ-उतार, योग्य दराचा अभाव, साठवणूक व वाहतूक समस्या यावर सहकाराच्या माध्यमातून उपाय शोधण्याचे त्यांनी आवाहन केले. “संस्थांमध्ये पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि शिस्त राखणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक सदस्याचा सहभाग हा संस्थेच्या यशाचा पाया असतो,” असेही ते म्हणाले.
महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, महिलांच्या सहभागामुळे संस्थांना नवी दिशा आणि ऊर्जा मिळते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे होते. यावेळी सहकार भारती मत्स्य सहकारी संस्था प्रकोष्ठ मुंबईचे अध्यक्ष वासुदेवराव सुरजुसे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय दिनेश धोपे, चंद्रपूर जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्ष सतीश वासमवार, चंद्रपूर जिल्हा भोई समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना पारशिवे, स्थापत्य अभियंता दिपक मारबते, प्रकाश डायरे तसेच चंद्रपूर जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष यादवराव मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकाश डायरे यांनी मांडली, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीहरी शेंडे यांनी केले.



